पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी पुण्यात याबाबत माहिती दिली. दहावी-बारावीची परीक्षा यंदा दर वर्षीच्या तुलनेत लवकर सुरू होत आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षांचा निकालही १५ मेपर्यंत जाहीर होईल, असे भुसे यांनी स्पष्ट केले. भुसे यांनी शुक्रवारी राज्य मंडळात शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रतापसिंह, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार या वेळी उपस्थित होते.
शिक्षण विभागातील विविध विषयांचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थिसंख्या वाढवण्यासाठी शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी अशा सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत, असेही भुसे म्हणाले.
राज्यात एक लाखाहून अधिक शाळा, दोन कोटी दहा लाख विद्यार्थी आणि साडेसात लाख शिक्षक आहेत. विद्यार्थिकेंद्रित, गुणवत्तापूर्ण, आनंददायी शिक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीत झाल्यानंतर राज्यगीत गाण्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच, सर्व शाळांनी मराठी विषय शिकवणे बंधनकारक असल्याचेही भुसे म्हणाले.