Published On : Wed, Nov 4th, 2020

योजनांचे फलनिष्पत्ती अहवाल तात्काळ सादर करावे -जिल्हाधिकारी संदीप कदम

Advertisement

भंडारा : मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात रोजगाराभिमुख योजना राबविण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी यंत्रणांना दिले. त्याचप्रमाणे आतापर्यंत राबविण्यात आलेल्या योजनांचे फलनिष्पत्ती अहवाल तात्काळ सादर करावे, असे त्यांनी सांगितले.

मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस शिक्षण, आरोग्य, बालकल्याण, कृषी, महिला आर्थिक विकास महामंडळ, रा.प. महामंडळ, रेशिम, खादी व ग्रामोद्योग विभागांचे विभाग प्रमुख उपस्थिती होते. या सर्व विभागाकडील नियमित योजनांसोबत उत्पन्न वाढीच्या योजनांचाही आढावा घेण्यांत आला. बैठकीमध्ये योजनांचे सादरीकरण करण्यात आले.

सन 2019-20 मध्ये राबविलेल्या योजनांचा आढावा घेवून या योजनांची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. कोसा कापड, ई-रिक्षा, भाजीपाला किट, मिनी मॉल (भाजीपाला विक्री केंद्र) या सारख्या योजनांबाबत राज्यपाल महोदय यांच्या आगामी आढावा बैठकीकरिता सादरीकरण करावयाचे आहे त्यादृष्टीने यंत्रणांनी योजनांचे फलनिष्पत्ती अहवाल व सादरीकरण देणेबाबत निर्देश दिले.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सुचविलेल्या भंडारा जिल्हयातील मानव विकास कार्यक्रम अंतर्गत येणाऱ्या तालुक्यांसाठी रोजगार निर्मितीकरिता कृषी विकासांतर्गत ट्रॅक्टर खरेदी, भाजीपाला किट वाटप, नर्सरी उद्योग व इतर शेतीपुरक व्यवसाय इत्यादी यासाठीचे योजना प्रस्ताव कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळा मार्फतीने राबविण्यासाठी शासनास सादर करणे संदर्भातही आढावा घेण्यात आला. या योजना प्रस्तावांचे निधीसाठी लवकरच शासनाच्या नियोजन विभागाकडे मागणी करण्यात येईल, ज्यामुळे जिल्हयात रोजगार निर्मितीस वाव राहील, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.