नागपूर :राज्यातील विविध प्रश्नांवर सरकारला घेरण्यासाठी आज विरोधी पक्षाने विधानसभेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. या आंदोलनानंतर विधानसभेचे कामकाज काही काळ चालल्यानंतर पुन्हा १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर केलेल्या आंदोलनादरम्यान नाणार प्रकल्प रद्द करा, लोकभावनेचा आदर करा, बोन्डअळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करा, शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.
आंदोलनानंतर कामकाज सुरू होताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाणारच्या मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सरकारने बनावट कागदपत्रांच्या आधारावर जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. सभागृहाचे कामकाज बाजूला सारून नाणार प्रकल्प रद्द करण्याची घोषणा सरकारने करावी, अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली.
नाणारच्या ग्रामस्थांनी शिवसेनेच्या आमदारांना हुसकावून लावल्याचे पाटील यावेळी म्हणाले. सेनेने नाणार वासियांना वेठीस धरून त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी करताच शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळात गदारोळ केला. या गदारोळामुळे सभापतींनी कामकाज १० मिनीटांसाठी स्थगित केले होते. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा १२ वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले आहे.










