प्रभाग २१च्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी अधिका-यांना निर्देश
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील प्रभग २१ येथील नागरिकांच्या समस्यांवर पुकारण्यात आलेले आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर सोमवारी (ता.२४) महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांच्या समस्यांवर संबंधित अधिका-यांना तातडीने कार्यवाही करण्याबाबतही निर्देश यावेळी देण्यात आले.
नागरिकांच्या पाण्याच्या समस्येवर ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी जलत्याग आंदोलन पुकारले होते. रविवारी (ता.२३) ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांनी नागरिकांच्या समस्यांबाबत चर्चा करून त्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानुसार सोमवारी (ता.२४) सतरंजीपुरा झोन कार्यालयात ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीमध्ये महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, उपसभापती भगवान मेंढे, झोन सभापती अभिरूची राजगिरे, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, नगरसेवक रमेश पुणेकर, नगरसेवक नितीन साठवणे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी यांच्यासह ओसीडब्ल्यूचे अधिकारी व डेलिगेट्स उपस्थित होते.
यावेळी विविध भागात राहणा-या नागरिकांनी भेडसावणा-या समस्या महापौर नंदा जिचकार व सर्व मान्यवरांपुढे मांडल्या. सर्व समस्या लक्षात घेता त्याबाबत तातडीने उपाययोजना करून आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर करण्याचे निर्देश याप्रसंगी महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित अधिका-यांना दिले. नागरिकांच्या सर्व समस्या लक्षात घेउन त्यावर कार्यवाहीचे निर्देश दिल्यानंतर ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी सर्व विषयावर समाधान व्यक्त केले.