Published On : Fri, Jan 24th, 2020

व्यवस्था चालविण्याचे सामर्थ्य तुझ्या मनगटात…

महिला उद्योजिका मेळाव्यात महिलांना मिळाला यशाचा मंत्र

नागपूर: स्त्री मुळातच कर्तृत्ववान आहे. मोकळ्या आकाशात स्वच्छंद विहार करण्याचे बळ उपजतच तिच्या पंखात आहे. स्त्री सबलीकरणाच्या बाता मारून तिचे सक्षमीकरण होणार नाही, कारण प्रत्येक स्त्री ही सबल आहे. कोणत्याही मृगजळात न अडकता स्त्री, तुला अवकाश मिळाले आहे, तू भरारी घे, कर्तृत्वाने मोठी हो, व्यवस्था चालविण्याचे सामर्थ्य तुझ्या मनगटात आहे, उठ आणि स्वत:ला सिद्ध कर, असा मंत्र महिला उद्योजिका मेळाव्यात महिलांना मिळाला.

नागपूर महानगरपालिका, महिला व बालविकास समिती आणि समाजकल्याण विभागाच्या वतीने १९ ते २६ जानेवारी रोजी रेशीमबाग मैदानावर आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या सहाव्या दिवशीचे उद्‌घाटन पार पडले. याप्रसंगी मंचावर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती संगीता गिऱ्हे, उपसभापती विशाखाताई मोहोड, नगरसेविका जयश्री वाडीभस्मे, मंगला खेकरे, वंदना भगत, उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना नगरसेविका वंदना भगत म्हणाल्या, ‘उद्योजिका’ हा दशकातला सर्वात महत्त्वाचा शब्द आहे. कारण या शब्दाचा अर्थच ‘आर्थिकदृष्ट्या सबल’ असा होतो. स्त्रियांचे आर्थिक स्वावलंबन त्यांना समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढू शकते. महिला उद्योजिका मेळाव्यासारख्या आयोजनातून हे शक्य आहे. महिलांना उद्योगाची कास धरून आर्थिकदृष्ट्या नेतृत्व करण्याची संधी यानिमित्ताने मिळत आहे, अशा शब्दात त्यांनी महिला उद्योजिका मेळाव्याचे कौतुक केले. आज ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रात वरिष्ठ पदावर महिला कार्यरत आहेत. इतिहासात, संत परंपरेतही महिलांचे कर्तृत्व झाकल्या गेले नाही. इतिहासातील जिजाऊ, सावित्रींच्या कर्तृत्वाचा वारसा आपसूकच महिलांकडे आहे. त्यामुळे मनाची कणखरता आणि बुद्धीची प्रगल्भता या जोरावर महिलांनी आपल्या कार्याचा ठसा प्रत्येक क्षेत्रात उमटविला आहे. उद्योग क्षेत्रात महिला उद्योजिकांचा नवा अध्याय सुरू झाला असून महिला उद्योजिका मेळाव्याच्या माध्यमातून त्याला बुस्ट मिळत आहे, असेही त्या म्हणाल्या.

शासनातर्फे २६ जानेवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान लोकशाही पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगत मतदार यादीत नाव नोंदवावे आणि प्रत्येक निवडणुकीत मतदान करावे, असे आवाहन उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे यांनी केले. संचालन अंकिता मोरे यांनी केले.

पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
महिला उद्योजिका मेळाव्याच्या सहाव्या दिवशी पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. शुक्रवारी सत्कार करण्यात आलेल्या सत्कारमूर्तींमध्ये डॉ. संगीता देशमुख, प्रेमलता डागा, डॉ. संगीता फुलसुंगे, अंकिता देशकर, डॉ. अरुणा गजभिये यांचा समावेश होता. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

‘बाई वजा आई’ने केला मनोरंजन
महिला उद्योजिका मेळाव्याच्या सहाव्या दिवशी ‘आई वजा बाई’ या ‘सेलिब्रिटी प्ले’चे आयोजन करण्यात आले आहे. या विनोदी मराठी नाटकासाठी मराठी रसिकांनी महिला उद्योजिका मेळाव्यात एकच गर्दी केली. नाटकाच्या निर्माती रेशमा रामचंद्र आणि कलावंत सुप्रिया विनोद, गौरी शिरोळकर, अर्पणा शेम कल्याणी, नूतन जयंत, हेमांगी वेल्हणकर, राजश्री निकम, वंदना सरदेसाई यांचे महिला व बालकल्याण समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. या विनोदी नाटकाने रसिकांचे चांगलेच मनोरंजन केले.

दिव्यांगाना मार्गदर्शन
महिला उद्योजिका मेळाव्यात दुपारच्या सत्रात दिव्यांना विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग आणि राज्य शासनाच्या दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली. यावेळी दिव्यांगांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.