मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची थेट ऑफर दिली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपप्रसंगी केलेल्या या टिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा चांगलीच गाजू लागली आहे.
फडणवीस म्हणाले, “उद्धवजी, २०२९ पर्यंत विरोधकांसाठी काही स्कोप नाही. इकडे यायचं असेल, तर स्कोप आहे. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू.” या सूचक वक्तव्यामुळे ठाकरे गट आणि भाजपमध्ये पुन्हा युती होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
फडणवीसांनी ठाकरे गटाला “मित्रपक्ष” म्हणून संबोधल्याने ही ऑफर केवळ विनोद किंवा टोलेबाजी नसून, एका संभाव्य नव्या समीकरणाचा इशारा असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले होते, त्यामुळे मनसे-ठाकरे गट युतीचे संकेत मिळत होते. आता भाजपकडून आलेल्या या ऑफरमुळे नव्या राजकीय घडामोडींचा अंदाज वर्तवला जात आहे.
या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या गटाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, ठाकरे गटातील काही नेत्यांमध्ये हालचाली सुरू झाल्याचं वृत्त आहे. ही ऑफर स्वीकारली जाते की नाकारली, यावर आगामी राजकीय दिशा अवलंबून असेल. महाराष्ट्रातील सत्ता समीकरणांमध्ये पुन्हा एकदा उलथापालथ होणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.