Published On : Tue, Apr 6th, 2021

पक्षात गटातटाचे राजकारण करू नका : ना. गडकरी

एक परिवार समजून कार्यकर्त्यांनी काम करावे
भाजपाचा स्थापना दिवसानिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद

नागपूर: भारतीय जनता पक्ष हा एक आपला परिवार आहे, असे समजून कार्यकर्त्यांनी काम करावे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्याचा सन्मान राखला गेला पाहिजे. त्याच्यावर प्रेम केले पाहिजे. चांगले वातावरण पक्षात निर्माण व्हावे. गटातटाचे राजकारण पक्षात करू नका, असे आवाहन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

भाजपा स्थापना दिनानिमित्त व्हीसीच्या माध्यमातून ना. गडकरी कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमाला शहर अध्यक्ष व आ. प्रवीण दटके, ज्येष्ठ नेते प्रा. योगानंद काळे, खा. विकास महात्मे, माजी खा. अजय संचेती आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत. हा पक्ष एका दिवसात मोठा झाला नाही. प्रत्येक कार्यकर्ता आणि नेत्याचा हा पक्ष मोठा करण्यात सहभाग आहे. अनेक कार्यकर्त्यांनी आपले जीवन पक्षासाठी समर्पित केले. अनेक अडचणींचा सामना केला, अशा कार्यकर्त्यांना विसरता येणार नाही.

आपला पक्ष आता सत्तारूढ पक्ष आहे. लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधी पक्षाने कसे काम करायचे याचे काही नियम आहेत. सत्तेत असताना लोककल्याण तर जागरूक विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष आणि सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याचे काम आपण केले आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- सत्तारूढ पक्ष म्हणून पुढे काय करायचे यासाठी आपल्याला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. आपण का काम करायचे, कशासाठी करायचे, कोणासाठी करायचे हे प्रश्न कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचे आहेत. सबका साथ आणि सबका विकास म्हणून काम करताना दलित, पीडितांना प्राधान्याने न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आपल्याला काम करायचे आहे. आपला विचार, आदर्श आणि सिध्दांतानुसार आपल्याला वागायचे आहे. आपल्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

वाईट दिवसात एकजुटीने राहणे शक्य असते, पण चांगल्या दिवसात ते कठीण असते असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- चांगल्या दिवसात एकजूट राहिली पाहिजे, एकमेकांवर विश्वास व्यक्त झाला पाहिजे, एकमेकांवर प्रेम कायम राहिले पाहिजे. शेवटी पक्षाच्या हिताचेच निर्णय घेतले जातात हे लक्षात घेतले पाहिजे. जातीपातीचे आणि गटबाजीचे राजकारण पक्षात नको. आपल्या हातातून जिल्हा परिषद गेली, पदवीधरमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही, याचे आत्मपरीक्षण करून पक्षात उत्तम वातावरण निर्माण करा, गटातटाचा विचार करू नका. कार्यंकर्त्यामधील दोष कमी करून चांगल्या गुणांची वाढ करा आणि आगामी मनपा निवडणुकीत एकजुटीने कामाला लागून निवडणूक जिंका, असेही ना. गडकरी म्हणाले.