Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Oct 24th, 2018

  सौर ऊर्जेद्वारे मागेल त्यांना स्वस्त व शाश्वत वीज उपलब्ध करणे हेच धोरण

  पुणे: सौरवीज प्रकल्पामुळे राज्याचा कायापालट होणार असून 2022 पर्यंत संपूर्ण कृषीपंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यायोगे शेतकऱ्यांना दिवसा, स्वस्त व शाश्वत वीज मिळणार असून क्रॉससबसीडीचा भार कमी होणार असल्याने औद्योगिक व वाणिज्यिक स्वस्त होणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

  महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मुख्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश बापट होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी, महाऊर्जाचे महासंचालक आनंद लिमये, अतिरिक्त महासंचालक पुरुषोत्तम जाधव उपस्थित होते.

  ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले की, राज्य भारनियमनमुक्त झाल्यानंतर आता भविष्याच्या दृष्टीने अपारंपारिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी सौरऊर्जा अतिशय महत्वाची आहे. सौरऊर्जेच्या बाबतीत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून राज्यात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना सुरु झालेली आहे. येत्या वर्षभरात सुमारे 7 लाख 50 हजार कृषीपंपांना या योजनेद्वारे वीजरपुरवठा सुरु होणार आहे.

  त्याच प्रमाणे राज्यातील 1500 नळपाणी पुरवठा योजना सौरऊर्जेवर सुरु असून यंदा आणखी 2000 योजना लवकरच सौर ऊर्जेवर आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. सौर ऊर्जेमुळे शाश्वत आणि स्वस्त वीज उपलब्ध होणार आहे. सौर ऊर्जेचे दर कृषीपंपांसाठी 2 रुपये 72 पैसे असे आले आहेत. ते येत्या वर्षभरात एक रुपयाने स्वस्त होतील. त्यामुळे कृषीपंपांचे वीजदर तीन रुपयांनी कमी होणार असल्याने क्रॉस सबसीडीचा औद्योगिक ग्राहकांवरील भारही कमी होणार आहे. त्यामुळे औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांचे वीज दर थेट 3 रुपयांनी कमी होणार आहेत. या शासनाच्या कार्यकाळात कृषीपंपांना साडेसात लाख नवीन वीजजोडण्या देण्यात येत असून त्यातील 5 लाख 18 हजार कृषीपंपांचे प्रलंबित वीजजोडण्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे तर उर्वरित वीजजोडण्यासांठी उच्च दाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजना सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले.

  विजेप्रमाणे चपळ व कार्यक्षममंत्री – गिरीश बापट
  ऊर्जा खात्यात उत्कृष्ट टीमवर्क आणि योग्य नेतृत्वामुळे या खात्याची विलक्षण घौडदौड सुरु असल्याचा सुरवातीलाच उल्लेख करून अन्न व नागरी पुरवठामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा विजेप्रमाणे चपळ व कार्यक्षम मंत्री म्हणून गौरव केला. गेल्या 4 वर्षात हे राज्य भारनियमनमुक्त करून विजेच्या संकटावर कधी मात करायची आणि मार्ग काढण्याचे कसब फक्त बावनकुळे यांच्यातच असून पवनऊर्जा, सौरऊर्जेकडे त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. कार्यक्षम मंत्र्यांमध्ये बावनकुळे हे अग्रक्रमावर असल्याचे बापट म्हणाले.

  भाजप-सेनेच्या काळात खऱ्या अर्थाने राज्य भारनियमनमुक्त करण्याचे काम ऊर्जावान मंत्री बावनकुळे यांनी केल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले. महाऊर्जाची ही हरीत इमारत देशातील पहिली इमारत असून ती भविष्यात मैलाची दगड ठरणार आहे. सौरऊर्जेची अधिक निर्मिती करून पारंपरिक ऊर्जा बचत करावी व मोठ्या प्रकल्पांना, उद्योगांना कमी दरात वीज देण्यात यावी यासाठी त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचेही शिवतारे म्हणाले.

  सौरऊर्जेमुळे रोजगार वाढेल, वीज बचत होईल व राज्याचे उत्पन्न वाढेल अशी महत्वपूर्ण भूमिका बावनकुळे यांची असल्याने देश बदल रहा है या वाक्याला साजेसे त्यांचे काम असल्याचे शिवतारे म्हणाले.

  हाऊर्जाचे महासंचालक आनंद लिमये म्हणाले, की गेल्या 4 वर्षात ऊर्जामंत्र्यांच्या नेतृत्वात महाऊर्जाचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. फक्त योजनांपर्यंत महाऊर्जाची व्याप्ती नाहीतर योजना तयार करणे, त्या राबवणे व धोरणांची अंमलबजावणी करणे हेही महाऊर्जाचे काम आहे. महाऊर्जाला खऱ्याअर्थाने आकार देण्याचे काम ऊर्जामंत्र्याच्या काळात आणि त्यांच्याच नेतृत्वात झाल्याचे लिमये म्हणाले.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नवीन इमारतीबद्दल सविस्तर माहिती अतिरिक्त महासंचालक पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले. या इमारतीची रचना कशी असेल याबद्दल एक चित्रफित याप्रसंगी दाखविण्यात आली. कार्यक्रमाला महाऊर्जाचे प्रादेशिक संचालक महेश आव्हाड, महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे इतर वरिष्ठ अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145