
नागपूर – कळमेश्वर तालुक्यातील शंकरपट गावात रविवारी सायंकाळी साक्षगंधाचा कार्यक्रम संपताच आनंदाचे वातावरण क्षणात गोंधळात बदलले. नात्यातील मुलीच्या विधीनंतर जुन्या वैमनस्याची ठिणगी पेटली आणि थेट गोळीबारापर्यंत प्रकरण गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर देवा ऊर्फ परमेश्वर पिसाराम एकनाथ याने जुन्या वादातून बाल्या हिरामण गुजर याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. क्षणात वाद वाढत गेला आणि वादातून प्रत्यक्ष मारहाण व नंतर गोळीबार झाला. देवासोबत तपन पिसाराम एकनाथ, आकाश एकनाथ, मोरेश्वर एकनाथ, सावन एकनाथ, काशिराम एकनाथ आणि दिनेश सनेश्वर यांनीही या हल्ल्यात सहभाग घेतल्याचे समोर आले आहे.
गोळीबारात बाल्या गुजर गंभीर जखमी झाला. त्याच्या मांडी आणि छातीवर गोळ्या लागल्याने त्याला तातडीने नागपूर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. अचानक झालेल्या गोंधळात बाल्याचा भाऊ सुनील गुजर, मुकश मापूर आणि काही पाहुणेही जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी पंचनामा करून वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावले आणि काही तासांतच सर्व आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, चार महिन्यांपूर्वी बाल्या गुजरने देवा एकनाथचे अपहरण केल्याची नोंद असून त्याच वादातून ही गंभीर घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पुढील तपास सुरू आहे.









