
मुंबई : आगामी नगरपालिका निवडणुकांपूर्वी मतदार यादीतील गोंधळ आणखी गंभीर होत असताना ठाकरे बंधूंनी राज्य निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे. प्रारूप मतदार यादीवरील हरकती–सूचना दाखल करण्यासाठी किमान २१ दिवसांची मुदत द्यावी, अन्यथा सध्याच्या स्थितीत निवडणुका रद्द करून याद्या व्यवस्थित केल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करावी, अशी ठाम मागणी त्यांनी सोमवारी केली.
उद्धवसेना व मनसेच्या संयुक्त शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन या संबंधी सविस्तर चर्चा केली. शिष्टमंडळात आदित्य ठाकरे, ॲड. अनिल परब, अंबादास दानवे, बाळा नांदगावकर यांचा समावेश होता. निवडणूक प्रक्रियेला पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची विनंतीही या प्रतिनिधींनी केली.
दरम्यान, दुबार मतदारांच्या मुद्द्यावरही शिष्टमंडळाने गंभीर आक्षेप नोंदवला. परिशिष्ट ‘ब’ मध्ये एका मतदाराला एकाच दिवशी फक्त एकाच क्षेत्रात मतदान करता येते, अशी अट असली तरी प्रत्यक्षात एखादा मतदार एका दिवशी जिल्हा परिषदेत आणि दुसऱ्या दिवशी महापालिकेत मतदान करू शकतो, असे निदर्शनास आणून या परिशिष्टात आवश्यक बदल करण्याची मागणी करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे म्हणाले, “सध्याची व्यवस्था मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणारी आहे. आयोगाने तातडीने नियम स्पष्ट करावेत.”
मुंबईपुरता नव्हे, तर ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या महापालिका क्षेत्रांमध्येही प्रभागनिहाय इमारती चुकीच्या प्रभागात दाखल केल्याचा मोठा गोंधळ झाल्याचे ठाकरे बंधूंचे म्हणणे आहे.या त्रुटी दूर न झाल्यास संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.









