Published On : Sat, Apr 25th, 2020

स्थलांतरित रोजमजुरांची पायपीट सुरूच

पंधरा मानस आठ बाया दोन लहान मुलांसह करताहेत पायी प्रवास रामटेक(शहर प्रतिनिधी)लॉकडावूनने बांधकाम क्षेत्रातील मजुरांच्या जीवनात प्रचंड उलथापालथ केली असून अजूनही दररोज स्थलांतरित मजूर मोठ्या संख्येने आपल्या मूळ गावाकडे परत जात आहेत.रामटेक तुमसर राज्य महामार्गावरून मुख्य रस्त्याने तसेच आडवळणाने अनेक जण उपाशीपोटी प्रवास करत आहेत.

छत्तीसगड मधील मजूर गेल्या दहाबारा वर्षांपासून दिवाळी संपली की बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी दरवर्षी हैद्राबाद येथे जातात याही वर्षी बालाघाट जिल्ह्यातील सिंगणपूर गावचे महेश माणेश्वर (29),वाराशिवणी तालुक्यातील सप्ताटोला गावचे नरेश नेताम (28)पत्नी व तीनचार वर्षीय मुलामुलीसहित धानसिंग नेताम(26)आपल्या पत्नीसह हैदराबाद येथे गेले.लॉकडावूनच्या काळात बरेच दिवस तेथेच राहिल्यावर फक्त एक आठवडा केलेल्या कामाची मजुरी बाकी ठेवून तीन महिने केलेल्या कामातील उरलेली मजुरी ठेकेदारानी दिल्यावर 13 एप्रिलच्या रात्री सर्वजण गावाकडे निघाले .काही अंतर पायी तर काही वेळा ट्रकवर बसून ते बल्लारशा बॉर्डर पर्यंत आले.

तिथून चंद्रपूर मार्गे नागपूर ला कधी पायी तर कधी मिळेल त्या साधनाने नागपूरला आले.यात बरेचदा उपाशीपोटीच राहावे लागले. नागपूर ते रामटेक आणि समोर महादुला हा अंशी किमीचा प्रवासही पायीच केला. महादुला येथील शरद डडोरे यांना स्थलांतरित मजूर रस्त्याने जात असल्याची माहिती मिळताच त्यांनी राजेश काठोके,बादल गुरव,अमोल डडोरे ,शुभम मरस कोल्हे ,अविनाश सिंदराम यांना सोबत नेऊन ताबडतोब मुरमुरे ,फुटाणे बिस्कीट आणि पाणी नेऊन दिले.महादूल्यासमोरील भंडारबोडी या गावातून 17 जण पायीच कटंगीला जात होते. यात पाच बाया आणि दहा मानस. सावनेर तालुक्यातील पाटणसांवगी गावाजवळ रस्त्याचं बांधकाम सुरू होत.तेथेच गिट्टी आणि मुरूम टाकण्यासाठी आले होते.पण लॉकडावूनने काम बंद झाले.

ठेकेदाराने काहीच पैसे दिले नाही. मग सर्वच 17 लोक परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात कामाला गेले.शेवटच्या तोड्याचा कापूस वेचण्याचे काम किलोच्या हिशोबाने केले.पराटीचे फण उपटणे व वेचणे हे काम अडीचशे रुपये एकर प्रमाणे केले.आणि पोटापूरती रक्कम जमा झाल्यावर 15 एप्रिलच्या पहाटे गावाकडे निघाले.-जवळ असलेल्या भांड्यात जवळपास पाणी असेल त्या ठिकाणी स्वयंपाक करून जेवण उरकल्यावर दुपारच्या उन्हात आराम आणि बाकी वेळात पायी प्रवास करत आहेत.18 एप्रिलच्या रात्री रामटेकला पोचल्यावर रामटेक पोलिसांनी सर्वांना राजीव गांधी स्मृती सभागृहात थांबायला लावले आणि सर्वांच्या जेवणाची व्यवस्थाही केलीकटंगी येथील शैलेश बोपचे(33),अंतकला बोपचे(28)पतिपत्नी ,बालाघाट जिल्ह्यातील तिरोडी तालुक्यातील नांदी या गावचे नंदकिशोर वाघाडे,सोनू वाघाडे ,मुक्कु वाघाडे आणि सर्व महिला व मानस सतत पायी प्रवास करत आहेत.

सतत चालून चालून काहींच्या पायाला फोडे आलेले आहेत तर काही जण खूप थकलेले आहेत.ते गावाला नेऊन देण्यासाठी गाडीमालकाला पैसेही द्यायला तयार असून लॉकडावूनच्या काळात त्यांना कोणाचाच आधार भेटत नाही आणि हे या सर्वांची मजुरीची वीस हजार रुपयांची रक्कम ठेकेदाराकडेच बाकी आहे.लॉकडावून सुरू झाल्यानंतर रामटेक तुमसर राज्य महामार्गावर नागार्जुन व महादुला येथे पाचसहा दिवस दररोज मजुरांसाठी जेवणाची व्यवस्था दानशूर लोकांकडून केली होती.पण नंतर मजुरांचे जाण्याचे प्रमाण कमी झाल्यावर या ही व्यवस्था बंद केली-पण गेल्या पाच सहा दिवसापासून पुन्हा मजुरांचे गावाकडे जाण्याचे प्रमाण कमीजास्त प्रमाणात सुरू आहे. अ

शावेळी प्रशासनाने या भागात मजूर व त्यांच्या कुटुंबियासाठी दवाखाना,जेवण आणि छत्तीसगड बॉर्डर पर्यंत सोडण्यासाठी वाहनांची व्यवस्था करायला हवी होती. ज्यामुळे मजुरांना जाण्याची सुविधा झाली असती आणि त्यांच्या आरोग्याचीही तपासणी झाली असती.यात स्वयंसेवी संस्था व होतकरू लोकांची मदत घेता आली असती.पण अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होतांना दिसले नाही