Published On : Tue, Oct 15th, 2019

दक्षिण-पश्चिम नागपूरची जनता यावेळी इतिहास घडविणार- डॉ. आशीष देशमुख

Advertisement

नागपूर : दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांनी वाढती महागाई, केंद्र आणि राज्य शासनाची चुकीची धोरणे तसेच विद्यमान आमदार देवेंद्र फडणवीस यांनी मागील ५ वर्षांत मतदार क्षेत्राकडे केलेले दुर्लक्ष या मुद्द्यांवरून राज्य शासनास घेरणे सुरू केले आहे. फडणवीस यांच्या भाजप उमेदवारीला दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील नागरिकांचा विरोध असून यावेळी स्थानिक मतदाता काँग्रेसचे युवा पुढारी म्हणून आपल्याला निवडून देईल, असा प्रबळ विश्वास आशीष देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

अ. भा. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या लोककल्याणकारी मुद्द्यांना घेऊन काँग्रेसचे युवा पुढारी आशीष देशमुख यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक मैदानात उतरले आहेत. नवीन विचार, लोकहितकारी कार्यपद्धती आणि सामान्यांच्या मनाला भिडणारे जनकल्याणकारी मुद्दे ही त्यांच्या प्रचाराची वैशिष्ट्ये आहेत. याच पाश्र्वभूमीवर देशमुख यांनी सोमवारी अंबाझरी ले-आउट, डागा ले-आउट, गांधीनगर, बजाजनगर, अभ्यंकरनगर, लक्ष्मीनगर, दीक्षाभूमी, तकिया वॉर्ड, धंतोली या मार्गालगतच्या परिसरातून प्रचार केला. या दरम्यान त्यांनी ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती, माता-भगिनी, गृहिणी, फेरीवाले, छोटे व्यापारी आणि दुकानदारांशी संपर्क साधला. यावेळी सामान्य नागरिकांनी भाजप विरोधात त्यांचा रोष व्यक्त केला. वाढती महागाई, जीएसटी आणि नोटबंदीमुळे व्यवसायांचे कसे नुकसान झाले, गृहिणींना घरखर्च भागविणे कसे कठीण झाले नागरिकांनी याचा पाढाच वाचला.

वस्तीतील भगिनी म्हणाल्या की, अलिकडे महागाईमुळे १ किलोऐवजी १ पाव भाजी घ्यावी लागत आहे. सिलेंडर आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने गृहिणींना घरखर्च कमी पैशात भागविणे कठीण झाले आहे. तर सामान्य मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांनी कुटुंबीयांचे पोट कसे भरावे, असा प्रश्न आशीष देशमुख यांना विचारण्यात आला.

नागपूर परिसरातील एमआयडीसी, मिहान, सेझमध्ये स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळत नसल्याने फडणवीस यांच्या प्रति युवकांमध्ये चांगलीच नाराजी दिसून आली. भाजपने विधानसभा निवडणूक-२०१४ मध्ये जनतेला दिलेल्या वचनांचे काय झाले?, असा प्रश्न दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मतदाता विचारत आहेत. त्यावेळी भाजपने त्यांच्या जाहिरनाम्यात नागरिकांच्या समस्या सोडवू, युवकांना रोजगार देऊ, उद्योगधंद्यांचा विकास करू असे आश्वासन दिले होते; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहिरनाम्याची पूर्तता करणे जमले नाही. म्हणूनच की काय, ते स्वतः त्यांच्या मतदार संघात न फिरता भाजपच्या इतर पुढाèयांच्या हस्ते स्वतःचा प्रचार करवून घेत असल्याची घणाघाती टीका आशीष देशमुख यांनी केली. फडणवीस यांच्या कार्यकाळात केवळ श्रीमंतांची कामे झाली. गरिबांना तेवढे डावलल्या गेले, अशा प्रतिक्रिया जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

यावेळी डॉ. आशीष देशमुख यांनी नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. नागपूरसाठी महिलांची सुरक्षा वाढवून त्यांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न करणे, गृहोद्योगासाठी महिलांना विशेष प्रशिक्षण देणे, गुन्हेगारीवर आळा घालणे, उपराजधानीत महिला पोलिसांची संख्या वाढविणे, घन कचऱ्याची इकोफ्रेंडली विल्हेवाट लावणे, दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प सुरू करणे, रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा सुरू करणे, झोपडपट्टीमधील नाल्या स्वच्छ करणे, पाण्याची गळती बंद करणे, तेथील रस्ते दुरुस्ती करणे, सार्वजनिक ठिकाणी वायफाय सुरू करणे, नागपुरला प्लास्टिकमुक्त आणि प्रदूषणमुक्त बनविणे, नागरिकांसाठी मुबलक प्रमाणात प्रवाशी वाहने उपलब्ध करून देणे, नागपूर शहराचे स्मार्ट सिटीमध्ये रूपांतरण करणे, औद्योगिक नगर आणि विकास कामांवर भर देणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला २१व्या शतकातील जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले संकल्प असल्याचे दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार आशीष देशमुख यांनी सांगितले.

देशमुख यांनी प्रचारादरम्यान सोमवारी दंतेश्वरी आणि धनगरपुरा झोपडपट्टी, ऑरेंंज सिटी, खामला येथील नागरिकांना भेटी देऊन विकासासाठी काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, नागरिकांना काँग्रेसचे मुद्दे कळावे यासाठी सोमवारी सायंकाळी दक्षिण-पश्चिम भागात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. ज्याला स्थानिक नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.