Published On : Sat, Jul 4th, 2020

शेती नियोजनातूनच आर्थिक उन्नतीचा मार्ग – कृषी मंत्री

Advertisement

कृषी संजिवनी सप्ताहाचा शुभारंभ

नागपूर : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोबतच आधुनिक व नियोजनबद्ध शेती करण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असून मूल्यवर्धित पीक पध्दती आणि गुणवत्ता व दर्जा राखून आर्थिक उन्नती साधता येईल, असे मत कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले. मांडवा तालुका हिंगणा येथे आयोजित कृषी संजिवनी सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मांडवा येथील प्रगतशील शेतकरी बळवंतराव डढमल यांच्या शेत शिवारात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जिल्हा परिषद कृषी सभापती टिपेश्वर वैद्य, सभापती उज्वला बोढारे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप बंग, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमूख, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. कुसाडकर, तालुका कृषी अधिकारी श्री. परांजपे, जिल्हा तांत्रिक सल्लागार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान शिवचरण राजवाडे व कृषी विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री. भुसे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेत शिवाराची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रयोगशील शेती काळाची गरज असून शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांची शासन रिसोर्स बँक तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी शेतीचा आराखडा करण्यासोबतच व्यापारी दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले.

खते व बियाण्यांपासून राज्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीचा पोत खराब होऊन उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. असे त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगून श्री. भुसे म्हणाले की, परभणी कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली असून या समितीचा अहवाल प्राप्त होताच दोषी असणाऱ्या बियाणे कंपन्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या समितीने सोयाबीनचे आतापर्यंत पन्नास हजार नमुने तपासले आहे. हा अहवाल शासनास लवकरच सादर होणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

शेतमाल वाहतूक संदर्भात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी बाबत पोलीस विभागाशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, शेतकऱ्यांना बारा तास वीज देण्याबाबत शासन लवकरच धोरण आखणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

लॉकडाऊन काळात लवकी, देशी दोडकी, टमाटर, भेंडी, गवार, चवळी, वाल, काकडी, कारली, वांगी, गीलकी, टरबूज, तोंडली आदी भाजीपाला पीक घेण्यामध्ये श्री. डढमल विविध तंत्रज्ञान वापरतात, त्यामुळे त्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या हंगामात त्यांनी तीस लाखाहून अधिक रुपयांचे भाजीपाला उत्पादन घेतले आहे. नागपूर येथील शेतकरी भांडार यांना “ फॉर्म टू मॉल आणि होम ” या कृषी विभागाच्या संकल्पनेनुसार दररोज भाजीपाला पुरवठा करण्याचे नियोजन केले. मांडवा मारवाडी येथील श्री. डढमल यांच्या शेतातील पिकाची पाहणी कृषीमंत्र्यांनी केली व त्यांचे कौतूक केले. हा प्रयोग अनुकरणीय असून सर्व शेतकऱ्यांनी याच पध्दतीने तंत्रज्ञानावर आधारीत आधुनिक शेती करावी. असा सल्ला त्यांनी दिला.

कृषी विभागाने तयार केलेल्या ‘कृषी सल्ला’ पुस्तिकेचे कृषी मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी कृषी सभापती टिपेश्वर वैद्य, प्रगतशील शेतकरी बळवंतराव डढमल, देवानंद टोंगे यांची भाषणं झाली. कृषी संजिवनी सप्ताहात गावा गावातील शेतात कृषी सल्ला कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या दरम्यान कृषी विभागाने 1430 गावसभा घेतल्या. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी प्रास्ताविकात दिली. यावेळी उपस्थितांनी वृक्षारोपण केले.

Advertisement
Advertisement