Published On : Sun, Apr 15th, 2018

गडचिरोली जिल्हा प्रगतीशील करण्याचे उद्दिष्ट गाठणार – मुख्यमंत्री

Advertisement

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याची प्रधानमंत्री मोदी यांच्या आकांक्षित जिल्ह्यांपैकी एक म्हणून निवड झाली आहे. ती बदलून गडचिरोली हा प्रगतीशील जिल्हा करण्याचे उद्दिष्ट गाठायचे आहे. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. यासाठी 40 कोटीचा विशेष निधी यंदा नियोजन अंतर्गत दिल्याचेही ते म्हणाले.

जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी उभारण्यात आलेले जिल्हा महिला व बाल रुग्णालय इमारतीचे लोकार्पण तसेच नियोजन भवनाच्या नूतन इमारत व सभागृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज झाले. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत होते. आदिवासी विकास व वन राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची या कार्यक्रमास मुख्य उपस्थिती होती.

अत्यंत सूंदर अशी रुग्णालयाची इमारत आहे. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या इमारतीचे वर्णन केले. येथे अत्यंत आधुनिक अशा यंत्र व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्हावासियांना उत्तम उपचार उपलब्ध होतील. माता व बालमृत्यू रोखण्याचे काम यामुळे शक्य होईल असे ते म्हणाले.

अवघड ठिकाणी सेवा देण्यासाठी भत्ते देण्यात येतात, परंतु ते सर्वांना मिळत नाहीत अशी मागणी होती. याबाबत विभागीय आयुक्तांच्या समितीचा अहवाल प्राप्त झाला त्यानुसार आरोग्य सेवा देणाऱ्यांना तसा लाभ देण्याच्या दृष्टीकोणातून शासन आगामी काळात निर्णय घेईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

कार्यक्रमास व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, क्रिष्णा गजबे, नगराध्यक्ष योगिता पिपरे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त अनुपकुमार, मुख्य वनसंरक्षक डब्लू. एटबॉन, विशेष पोलिस महानिरिक्षक शरद शेलार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल आदींची उपस्थिती होती.

बेघरमुक्त जिल्हा
आगामी दोन वर्षात जिल्हा बेघरमुक्त करायचा या भूमिकेतून काम सुरु करा असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. याद्या तयार असतील तर येत्या 2 ते 3 महिन्यात सर्वांना पहिला हप्ता द्या असे मुख्यमंत्री म्हणाले.

गडचिरोली जिल्हा आज हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली. याबाबतचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांना प्रदान करण्यात आले.

लोहप्रकल्प क्षमता
कोणताही प्रकल्प नसलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लॉयड्स च्या माध्यमातून लोह प्रकल्प सुरु होत आहे. एक प्रकल्प झाला की आता असे अनेक प्रकल्प येऊ शकतात त्या स्वरुपाची क्षमता जिल्ह्यात आहे. येथील लोहखनिजावर येथेच प्रक्रिया व्हावी व स्थानिकांनी रोजगार मिळावा अशी आमची आग्रही भूमिका राहिलेली आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात वनांच्या माध्यमातून पर्यावरण संतुलन राखण्यात गडचिरोली जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. ही वने राखणाऱ्यांना न अडवता त्यांना वनपट्टे देणे, बांबू तसेच वनांवर आधारित उद्योगांना चालना देणे याला शासन प्राधान्य देणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

माता, बाल आणि अर्भकमृत्यू रोखणे हे आरोग्य विभागाचे ध्येय असून नव्या अद्ययावत रुग्णालयामुळे हे आता शक्य होईल असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी यावेळी केले.

माता व अर्भक मृत्यू रोखण्यासाठी संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. सध्या हे प्रमाण 95 टक्के आहे ते 100 टक्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणा करीत आहे असेही ते म्हणाले.

गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात तसेच नंदूरबार आणि पालघर सारख्या जिल्हयात विशेष बाब म्हणून शववाहिनी खरेदीची परवानगी आरोग्य विभागाला मिळावी अशी मागणी डॉ. सावंत यांनी याप्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे केली. सध्याच्या धोरणानुसार ॲम्ब्युलन्समध्ये शव नेता येत नाही व आरोग्य विभागाकडे शववाहिन्या नाहीत.

चामोर्शी सारख्या तालुक्यात आरोग्यसुविधांची कमतरता आहे. त्यामुळे स्थानिक आमदार डॉ. देवराव होळी यांनी केलेल्या मागणीनुसार येथे 100 खाटांचे रुग्णालय दिले जाईल असे आश्वासन डॉ. सावंत यांनी याप्रसंगी दिले.

जिल्ह्यातील महिलांना आता उपचारासाठी चंद्रपूर, नागपूर किंवा बाहेरील राज्यापर्यंत जावे लागणार नाही. या स्वरुपाच्या रुग्णालयाची जिल्ह्यात आवश्यकता होतीच असे प्रतिपादन पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी याप्रसंगी केले.

जिल्ह्यात गेल्या तीन साडेतीन वर्षात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. स्वातंत्र्यापासून जी गावे अंधारात होती त्या गावांना वीज पुरवून सरकारने एक प्रकारे सर्वांचे आयुष्य उजळविले आहे असे आत्राम म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या जिल्ह्यावर विशेष प्रेम आणि लक्ष आहे. त्यामुळे विकासासाठी निधीची कमतरता त्यांनी पडू दिलेली नाही असेही पालकमंत्री म्हणाले.

यावेळी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांचीही भाषणे झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

असे आहे नियोजन भवन
अत्यंत देखणी अंतर्गत व बाह्य सजावट असणारी इमारत. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बांधण्यात आलेल्या नियोजन भवन इमारतीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. भव्य अशा या इमारतीच्या उभारणीला 6 कोटी 65 लक्ष 26 हजार रुपये खर्च आला आहे.

दोन मजली बांधकाम जे एकूण 1128.69 चौरस मीटर आहे. यात पहिल्या मजल्यावर अद्ययावत असे 150 आसन क्षमतेचे सभागृहदेखील आहे. सभागृह पूर्णपणे साऊन्डप्रुफ करण्यात आले असून यात 3 प्रोजेक्टर देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर व्हीआयपी कक्ष तसेच नियोजन अधिकारी यांचे कक्ष आहेत. प्रवेश दालनात फ्लोअरिंगसाठी ग्रॅनाईटचा वापर करण्यात आला असून दालनात लाकडी व इतर खोल्यांमध्ये व्हिट्रीफाईड टाईल्सचा वापर करण्यात आला आहे.

नियोजन अधिकारी, सहाय्यक नियोजन अधिकारी तसेच लेखाधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र असे कक्ष या इमारतीत आहेत. याखेरीज अभ्यागतांना बसण्यासाठी सोफा आणि खुर्च्यांची व्यवस्था आहे. दिव्यांगांना सुलभ प्रवेश व वावर शक्य व्हावा यासाठी रॅम्प तसेच प्रसाधनगृह याची वेगळी व्यवस्था येथे आहे.

तळमजल्यावरील क्षेत्र 663.67 चौरस मीटर असून पहिल्या मजल्याचे क्षेत्र 465.02 चौरस मीटर इतके आहे. मुख्य इमारतीचे बांधकाम 15 महिन्यात पूर्ण करण्यात आले. यासाठी 3 कोटी 5 लक्ष 42 हजार रुपये खर्च आला.

अत्यंत सुंदर आणि प्रेक्षणिय अशा अंतर्गत सजावटीचे काम 6 महिन्यांमध्ये पूर्ण झाले यासाठी 1 कोटी 76 लक्ष 26 हजार रुपये खर्च आला आहे.
या कार्यक्रमाचे संचलन ऐश्वर्या भालेराव आणि प्रभाकर कुबडे यांनी केले तर आभार निवासी शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे यांनी केले.