Published On : Tue, May 18th, 2021

शहरात वर्षभरात बेड्स संख्येत सात पटीने वाढ

Advertisement

पहिल्या लाटेच्या प्रारंभी केवळ ९८९ तर सद्यस्थितीत ७७४५ बेड्सची उपलब्धता

नागपूर: कोरोनाची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता नागपूर महानगरपालिका प्रशासन आरोग्य यंत्रणा बळकट करण्याच्या कामात लागली. १ एप्रिल २०२० रोजी नागपूर शहरात ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर असलेल्या एकूण बेड्सची संख्या केवळ ९८९ होती. मागील लॉकडाऊन आणि यंदाच्या कडक निर्बंधाच्या कालावधीत आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यावर प्रशासनाने भर दिला. सद्यपरिस्थितीत शहरात शासकीय, खाजगी आणि मनपा रुग्णालयांमध्ये एकूण ७७४५ बेड्सची उपलब्धता आहे. सप्टेंबर २०२० पासून मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी बेड्सची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना या कार्यात पदाधिका-यांची सुध्दा साथ मिळाली. या दूस-या लाटेमध्ये महापौर श्री. दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त आरोग्य यंत्रणेमागे खंबीरपणे उभे राहिले आणि बेड्सची संख्या वाढविण्यात यश प्राप्त झाले.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

१ एप्रिल २०२० रोजी ८०५ ऑक्सिजनयुक्त बेड्स होते. १८४ आयसीयू तर ८७ व्हेंटिलेटर असलेले बेड्स होते. आता शासकीय, मनपा आणि खासगी रुग्णालयात कोव्हिड रुग्णांसाठी ४८६५ ऑक्सिजनयुक्त, २२७४ आयसीयू तर ५८१ व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत.अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा याचा खाजगी रुग्णालयांमध्ये बेड्सची संख्या वाढविण्यामध्ये मोठा वाटा आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर २०२० मध्ये तर दुसऱ्या लाटेत एप्रिल २०२१ मध्ये रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली होती. मागील वर्षी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मनपा प्रशासनाने नियोजन करून टप्प्याटप्प्याने बेड्सची संख्या वाढविली. १ एप्रिल २०२० रोजी सर्व बेड्स मिळून ९८९ होते. १ ऑगस्ट २०२० रोजी ही संख्या १५१४ तर ३० सप्टेंबर २०२० रोजी ३४५४ करण्यात आली. दरम्यान रुग्णसंख्या कमी व्हायला लागली त्यामुळे बेड्सची संख्या कमी प्रमाणात वाढविण्यात आली. ३१ डिसेंबर २०२० रोजी ३९९३ करण्यात आली. मात्र, जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर घसरल्याने बेड्सची संख्याही कमी करण्यात आली. ३१ जानेवारीला ३९१० तर २८ फेब्रुवारीला कोरोना रुग्णांसाठी नागपूर शहरात ३९१३ बेड्स उपलब्ध होते.

दरम्यान मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरात शिरकाव केला. आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेता मा.पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या नेतृत्वात प्रशासनाने युद्धपातळीवर नियोजन केले. शासकीय, खाजगी आणि मनपा रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांच्या उपचारासाठी ३१ मार्चला ४६८२ बेड्स, १२ एप्रिलला ५५५३ बेड्स, १८ एप्रिलला ६३८७ बेड्स, २४ एप्रिलला ७१४४ बेड्स, २७ एप्रिलला ७३२७ बेड्स, १ मे रोजी ७६३२ बेड्स तर १३ मे रोजी ७७४५ बेड्सची उपलब्धता करून देण्यात आली. मनपा प्रशासनाने गरजेनुसार तातडीने पावले उचलून उत्कृष्ट नियोजन केले. काही रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यावरही भर दिला. या उत्कृष्ट नियोजनामुळे आता दुसऱ्या लाटेत मे महिन्याच्या उत्तरार्धात रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आणि मृत्यूसंख्येचा दरही घटला. प्रशासनाने कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे कोरोना नियमावलीचे पालन करा आणि कोरोनाचा साखळी खंडित करण्यास प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे

Advertisement
Advertisement