Published On : Thu, Jan 18th, 2018

देशाच्या एकात्मतेसाठी हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्याची गरज – हंसराज अहिर

मुंबई : देशाच्या एकता, एकात्मतेसाठी तसेच प्रशासन सुव्यवस्थित चालविण्यासाठी एकाच भाषेची गरज असते. म्हणूनच राजभाषा हिंदीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर आज येथे म्हणाले.

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या 2016- 17 साठीच्या पुरस्कारांचे वितरण वांद्रे येथील रंगशारदा नाट्यमंदिरात झालेल्या समारंभात श्री. अहिर तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी आमदार ॲड. आशिष शेलार, अकादमीचे कार्याध्यक्ष नंदलाल पाठक, सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसचिव संजय भोकरे, प्रसिद्ध हिंदी साहित्यिक पुष्पा भारती, जेष्ठ अभिनेते राजेंद्र गुप्त, कवयित्री चित्रा देसाई, दूरचित्रवाणी कलाकार वरुण बडोला आदी उपस्थित होते.

देशात प्रशासन चालविण्यासाठी एकाच भाषेची आवश्यकता असते असे सांगून श्री. अहिर पुढे म्हणाले, संरक्षण विभागातही आदेश देण्यासाठी हिंदीचाच उपयोग करावा लागतो. हिंदीबरोबरच आपण ज्या प्रदेशात राहतो येथील प्रादेशिक भाषेचाही सन्मान केला पाहिजे. हिंदीचा सर्वाधिक प्रचार-प्रसार साहित्याच्या माध्यमातून झाला आहे. त्याचबरोबर चित्रपट क्षेत्रही हिंदीच्या प्रसारास महत्त्वपूर्ण ठरले आहे. हिंदी देशाची राजभाषा आहे तिला राष्ट्रभाषा बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.

विनोद तावडे म्हणाले, राज्यामध्ये भिलार (ता. वाई) हे देशातील पहिले पुस्तकांचे गाव करण्यात आले आहे. याठिकाणी 40 हजार पुस्तके ठेवण्यात आली आहेत. आता 10 हजार हिंदी पुस्तके येथे ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी अकादमीने पुस्तकांची यादी सुचवावी, असेही ते म्हणाले.

वितरित करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये दोन अखिल भारतीय सन्मान जीवन गौरव पुरस्कार, आठ राज्यस्तरीय सन्मान जीवन गौरव पुरस्कार आणि अन्य 29 विविध पुरस्कार याप्रमाणे एकूण 39 पुरस्कार प्रदान करण्यात आले.

अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कारांतर्गत महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा जीवन गौरव पुरस्कार शशिभूषण वाजपेयी यांना आणि डॉ. राम मनोहर त्रिपाठी अखिल भारतीय हिन्दी सेवा जीवनगौरव पुरस्कार सूर्यप्रसाद दीक्षित यांना प्रदान करण्यात आला.

राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कारांतर्गत छत्रपती शिवाजी राष्ट्रीय एकता राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार माधव सक्सेना (अरविंद) यांना, साने गुरुजी राष्ट्रीय एकता राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार हृदयेश मयंक यांना, पद्मश्री अनंत गोपाल शेवडे हिंदी सेवा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री यांना, उषा मेहता हिंदी सेवा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार अश्विनीकुमार मिश्र यांना, गजानन माधव मुक्तिबोध मराठी भाषी हिंदी लेखक राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार डॉ. अशोक कामत यांना, कांतीलाल जोशी इतर हिंदी भाषी हिंदी लेखक राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार गंगाधर ढोबळे यांना, व्ही. शांताराम ललित कला हिन्दी विशिष्ट सेवा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार राम गोविंद यांना, सुब्रमण्यम भारती हिंदी सेतु विशिष्ट सेवा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार इंद्रबहादुर सिंह यांना प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारांसह संत नामदेव पुरस्कार (काव्य) डॉ. भगवान गव्हाणे (सुवर्ण), नेहा विलास भांडारकर (रौप्य), श्रीमती कमलेश चौरसिया तथा माधवी दीपक चौरसिया (कांस्य), विष्णुदास भावे पुरस्कार (नाटक) स्वामी बुद्धदेव भारती तथा बळवंत खोरगडे (सुवर्ण), डॉ. बालकृष्ण रामभाऊ महाजन (रौप्य), दिनेशचंद्र मिश्र तथा दिनेश बैसवारी (कांस्य), जैनेंद्र कुमार पुरस्कार (उपन्यास) श्रीमती रश्मी वर्मा तथा रश्मी रविजा (सुवर्ण), श्रीमती रेखा शिवकुमार बैजल (रौप्य), पवन चिंतामणी तिवारी (कांस्य), मुंशी प्रेमचंद पुरस्कार (कहाणी) प्रा. भारती गोरे (सुवर्ण), अरविंद श्रीधर झाडे (रौप्य), डॉ. दिप्ती गुप्ता (कांस्य), आचार्य रामचंद्र शुक्ल पुरस्कार (व्यंग, ललित निबंध) संतोष रामनारायण पांडेय तथा संतोष बागल (सुवर्ण), महेश दुबे (रौप्य), राजेश कुमार रा. मिश्र उर्फ राजेश विक्रांत (कांस्य) यांना देण्यात आला.