Published On : Mon, Dec 20th, 2021

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : नवचेतना उपक्रम

Advertisement

नागपूर : कोविड महामारीमुळे शाळा-महाविद्यालये बंद होती. या परिस्थितीचा विद्यार्थी व शिक्षक या दोघांवरही मानसिक परिणाम झाला. शिक्षक-विद्यार्थ्यांना या मानसिकतेतून बाहेर काढून त्यांच्यात पुन्हा अभ्यासासाठी उत्साह निर्माण करण्यासाठी
‘नवचेतना’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विभागाच्या शाळांमध्ये डिजीटल माध्यमांचा वापर करुन गुणात्मक शिक्षण पध्दती विकसित करण्यात येणार आहे, असे आदिवासी विकास आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

वनामती येथे शासकीय आश्रमशाळांच्या अध्यापकांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सहायक आयुक्त नयन कांबळे, महेश जोशी, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विश्वास पांडे, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सय्यद मुबारक, सबीता विनोद, सुशील आंबेकर, सुनीता मोर्य, बीनीता चॅटर्जी, गीता घोरमाडे, आभा मेघे, शिल्पा नेवासकर, अरविंद हिवसे, डॉ. किरवाडकर, जितेंद्र राठी, सपना पिंपळकर आदींनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

श्री. ठाकरे म्हणाले, कोरोना संकटकाळात शाळा-महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देण्यात येत होते. परंतू, दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांकडे डिजीटल साधनांची कमतरता असल्याने ते पूर्णत: यशस्वी झाले नाही. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना डिजीटल साधने उपलब्ध करुन देऊन अद्ययावत शिक्षण प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. संगणक प्रयोगशाळा, डिजीटल फलकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे ज्ञान तथा अध्यापन पद्धतीची योग्य संधी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. विविध शैक्षणिक ॲपचा विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी कसा उपयोग करावा, याचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण आश्रमशाळांच्या शिक्षकांना देण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

रचनात्मक शैक्षणिक पध्दतीचा उपयोग करुन विद्यार्थ्यांना मराठी, गणित व इंग्रजी विषयाचे ज्ञान करुन देण्यात येत आहे. प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मूलभूत क्षमता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रयोगात्मक विज्ञान, हसतखेळत ज्ञानार्जन आदीवर भर देण्यात येत आहे. दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी सुध्दा शिक्षणाच्या सर्व क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी विभागाव्दारे विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यांना शिक्षणाच्या सर्व संधी, साहित्य विभागाव्दारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.

आदिवासी विकास विभागात १९ अनुकंपाधारकांना नियुक्ती पत्र
कार्यशाळेत प्रारंभी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आदिवासी विकास विभागातील १९ अनुकंपाधारकांना कार्यशाळेत नोकरीचे नियुक्ती आदेश देण्यात आले. विभागाच्या या सकारात्मक कृतीमुळे संबंधित कुटूंबांना आर्थिक आधार मिळाला असून मोठा दिलासा मिळाला आहे.