Published On : Sat, Oct 2nd, 2021

पुतळे देखभालीच्या नागपूर पॅटर्नची देशभरात होणार अंमलबजावणी

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राखली जाणार पुतळ्यांची निगा

नागपूर, : नागपूर शहरामध्ये अस्तित्वात असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांचे योग्यप्रकारे व्यवस्थापन व्हावे याकरिता नागपूर महानगरपालिका आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये करार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमार्फत पुतळ्यांची स्वच्छता, देखभाल केली जाणार आहे. या कार्याचा शनिवारी (ता.२) संविधान चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शुभारंभ झाला. विशेष म्हणजे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या या संकल्पनेतील नागपूर पॅटर्नची देशभरात अंमलबजावणी करण्याचा निर्णय ‘नॅक’ द्वारे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता देशातील सर्व पुतळ्यांची स्वच्छता आणि देखरेख राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांद्वारे करण्यात येईल.

संविधान चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महापौर दयाशंकर तिवारी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी माल्यार्पण करून या कार्याचा शुभारंभ केला. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, मनपाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम, नागपूर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे, वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्थानचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल बनकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकाश शुक्ला आदी उपस्थित होते.

संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची स्वच्छता आणि देखरेखीची जबाबदारी वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्थानच्या राष्ट्रीय सेवा योजना चमूकडे असून या चमूद्वारे पुतळ्यासह परिसराची सुद्धा साफसफाई करण्यात आली.

यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले की, विद्यार्थीदशेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेत कार्य केले. त्यावेळी गावांमध्ये जाऊन स्वच्छतेचे सेवाकार्य केले जायचे. या कार्याला नवीन रूप देत नागपूर शहरातील पुतळ्यांची देखरेख राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत करण्याचा प्रस्ताव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याकडे ठेवला. कुलगुरूंनी हा प्रस्ताव मान्य करताच मनपा व विद्यापीठामध्ये यासंदर्भात करार करण्यात आला.

शहरातील एकूण ८४ पुतळ्यांची जबाबदारी विद्यापीठाच्या एकेका महाविद्यालयाला देण्यात आली असून स्वच्छतेसाठी मनपाचा एक स्वच्छता कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना सहकार्य करणार आहे. पुतळा धुण्यासाठी मनपाचे अग्निशमन विभाग सुद्धा मदत करेल. पुतळ्यांच्या देखभालीसाठी कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना मनपाद्वारे निःशुल्क अग्नी सुरक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. परिसरात कुठेही आग लागल्यास मनपाचे अग्निशमन पथक पोहोचण्यास उशीर होत असेल तर अशावेळी हे प्रशिक्षित अग्निशमन स्वयंसेवक बचावकार्य करू शकतील. मनपाद्वारे दरवर्षी ५०० अग्निशमन स्वयंसेवक तयार करण्याचा मानस आहे. नागपूर शहरातील पुतळे देखभालीच्या या संकल्पनेचे ‘नॅक’ पुढे विद्यापीठाद्वारे सादरीकरण करण्यात आले असता त्यांनी देशातील सर्व विद्यापीठात हा पॅटर्न देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला असून ही अभिमानास्पद बाब आहे, असेही महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले.

नागपूर पॅटर्न देशासाठी उदाहरण ठरेल : कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी
नागपूर शहरातील पुतळ्यांची देखभाल नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटद्वारे करण्याचा प्रस्ताव महापौर दयाशंकर तिवारी यांनी मांडला होता. या प्रस्तावाला गांभीर्याने घेत विद्यापीठाने त्यास मान्यता दिली. शहरातील महापुरुषांचे पुतळे असलेल्या ठिकाणाजवळील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना युनिटला ती जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी होत आहे. मनपा आणि नागपूर विद्यापीठाच्या या अभियानाचे शिक्षणमंत्र्यांकडून कौतुक करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहभागाने हा अभिनव नागपूर पॅटर्न असून हा पॅटर्न सर्व विद्यापीठांमध्ये अवलंबिण्यात येईल, असेही त्यांनी आश्वस्त केले. नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेली योजना समाजासाठी, देशासाठी आदर्श उदाहरण ठरेल, असा विश्वास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी व्यक्त केला.