Published On : Sat, Apr 18th, 2020

नवजात शिशुंसाठी मनपा उपलब्ध करून देतेय आहार

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा पुढाकार : पॉवर ऑफ वन वेलफेअर फाऊंडेशनचे सहकार्य

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात वृद्धांना, निराधारांना मदतीचा हात देणाऱ्या नागपूर महानगरपालिकेने आता नवजात शिशुंना आहार देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. मनपाच्या वतीने गरजू कुटुंबांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने लॉकडाऊनदरम्यान शहरातील गरजू व्यक्तींसाठी अन्नदानाची व्यवस्था करीत असताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या लक्षात हा प्रश्न आला. गरीब घरातील अनेक मातांची या काळात प्रसूती झाली. त्या घरात मनपातर्फे कुटुंबातील सदस्यांसाठी अन्न तर पुरविले जात आहे. मात्र नवजात शिशुंची होरपळ होत असल्याचे वास्तव त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब हेरून पॉवर ऑफ वन वेलफेयर फाऊंडेशन या संस्थेला आवाहन केले. मनपा आयुक्तांच्या आवाहनाला दाद देत सदर संस्थेने ही व्यवस्था केली. शनिवारी (ता. १८) शहरातील १० गरजू परिवारांना शिशु आहाराची व्यवस्था करुन देण्यात आली.


उपायुक्त तथा नोडल अधिकारी मिलिंद मेश्राम यांनी सांगितले की, गरजू कुटुंबातील नवजात शिशुंसाठी आहाराची व्यवस्था यापुढे करण्यात येईल. यासाठी गरजूंनी ०७१२-२५३९००४ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.