Published On : Mon, May 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

महापालिका प्रशासनाने महापौरांना मागितली अनधिकृत बांधकामाची माहिती, सर्व नगरसेवकांनाही नोटीस

Advertisement

नागपूर : सत्ताधारी भाजपमधील महापौर निता ठाकरे यांच्यासह उपमहापौर, सत्तापक्ष नेते व इतर सर्व नगरसेवक तसेच विरोधी पक्षनेत्यासह कॉंग्रेसच्या सर्व नगरसेवकांना महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली. महापालिकेच्या दहाही झोनच्या सहायक आयुक्तांनी नोटीशी बजावल्याने नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे. घराच्या बांधकामाचा नकाशा सादर करण्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आल्याने काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामाबाबत खातरजमा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जानेवारीत झालेल्या महापालिका निवडणुकीत अर्ज दाखल करताना सर्वच कागदपत्रांसह उमेदवारांनी शपथपत्र सादर केले होते. यात राज्य निवडणूक आयोगाने १२ डिसेबर २०२५ रोजी नवीन आदेश काढून नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेल्या शपथपत्रात अनधिकृत बांधकाम केल्यास नगरसेवक म्हणून अपात्र ठरेल, असे नगरसेवकांना नमूद करण्यास सांगितले होते. त्यानुसार जानेवारीतच अॅड. सुहास बिडकर यांनी महापालिकेला नोटीस देत याबाबत कायदेशीर नोटीस बजावण्यात यावी, अशी मागणी केली होती. मागील महिन्यात या पत्राची दखल घेत आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्तांना कारवाईच्या सूचना केल्या होत्या.

त्यानुसार उपायुक्तांनी सर्व सहायक आयुक्तांना पत्र दिले असून नेहरूनगर झोनच्या सहायक आयुक्तांनी महापौर निता ठाकरे व विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांना नोटीस बजावली. याशिवाय हनुमाननगर झोनने उपमहापौर लिला हाथीबेड, लकडगंज झोनच्या सहायक आयुक्तांनी सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांना नोटीस बजावली. केवळ यानांच नव्हे तर महापालिकेतील सर्व सभापती, नगरसेवकांनाही संबंधित झोनच्या सहायक आयुक्तांनी नोटीस बजावल्याचे अॅड. बिडकर यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. लक्ष्मीनगर, आशीनगर व मंगळवारी झोनकडील पत्राची प्रत त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याची पुस्तीही बिडकर यांनी जोडली. सात दिवसांत इमारत बांधकामाचा मंजूर नकाशा सादर करण्यात यावा, असे नोटीसमध्ये नमूद आहे. या नोटीसला काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी अद्याप उत्तर दिले नाही.

‘महापालिकेने खातरजमा करावी’

Advertisement

महापौरांसह सर्वच पदाधिकारी, नगरसेवकांना नोटीस बजावली. परंतु ही केवळ थातूरमातूर कारवाई ठरू नये. महापालिकेने सर्वच नगरसेवकांच्या बांधकामाबाबत खातरजमा करावी, अशी मागणी अॅड. बिडकर यांनी केली. शपथपत्रानुसार लोकप्रतिनिधींची माहिती पुढे यावी, कुणाशीही वैर नाही, सर्वजण कायद्यापुढे सारखे आहे, असे बिडकर म्हणाले.

अॅड. बिडकर यांच्या पत्रावरून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून यासंदर्भात पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार दहाही झोनच्या सहायक आयुक्तांना कारवाईसंदर्भात सूचना देण्यात आल्या आहे.

– निर्भय जैन, उपायुक्त, महापालिका.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.