Published On : Sun, Sep 1st, 2019

कुपोषण मुक्तीची चळवळ जनआंदोलन व्हावे -कमलकिशोर फुटाणे

Advertisement

मातांसह बालकांसाठी पोषण अभियानाचे आज उद्घाटन

नागपूर : माता व बालकाला पोषक आहार व चांगली आरोग्य सेवा मिळावी तसेच कुपोषण मुक्तीसाठी माता-बालक पोषण अभियान अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी सर्वस्तरावर हे अभियान प्रभावीपणे राबवावे तसेच कुपोषण मुक्तीच्या चळवळीचे जनआंदोलन होवून प्रत्येक मूल कुपोषणमुक्त व्हावे, असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात आज पोषण अभियानाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. माता व बालकांना सशक्त करण्यासाठी संपूर्ण राज्यात येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पोषण अभियान महिना राबविण्यात येत आहे.

यावेळी महिला बाल विकास अधिकारी भागवत तांबे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, अनिल किटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

माता व बालक पोषण आहार अभियान मिशन मोडवर राबवून ग्रामीण भागात या अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी एकमेकांशी उत्तम समन्वय साधावा. पोषण आहार हे केंद्र सरकारचे महत्वाकांक्षी अभियान आहे. माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी पोषण महिन्याचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुपोषणमुक्त भारतासाठी पोषण अभियान यशस्वीपणे राबवून लाभार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करावी, यावर विशेष भर दिला आहे. पोषक आहार व चांगले आरोग्य सेवा मिळण्यासाठी व कुपोषण दूर होण्यासाठीच्या विविध उपाययोजना व उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभाग घेवून कुपोषण मुक्तीकडे वाटचाल करु या, असा विश्वास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांनी यावेळी व्यक्त केला.

पोषण आहार अभियानांतर्गत जिल्ह्यात महिनाभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या अभियानातंर्गत जनजागृतीसाठी प्रभात फेरी, दिंडी, विविध स्पर्धा, पोषण मेळावे राबविले जाणार आहेत. पोषण अभियानाव्दारे प्रामुख्याने पोषण आहार व त्याचे महत्त्व, स्तनपान, ॲनेमिया आजार, वैयक्तिक स्वच्छता या विषयावर लक्ष देण्यासाठी प्रत्यक्ष गृहभेटीव्दारे पोषण आहार, चांगल्या आरोग्याच्या सेवेचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. महिनाभर चालणारे हे अभियान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार आहे. माता व बालकाला पोषक आहार व चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी तसेच कुपोषण दूर होण्यासाठी हे अभियान महत्वपूर्ण ठरणार आहे. जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबवून कुपोषण निर्मूलनाकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे महिला बाल विकास अधिकारी भावगत तांबे यांनी सांगितले.

यावेळी गटविकास अधिकारी, तालुका आरोग्‍य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.