Published On : Wed, Jun 13th, 2018

मोदी सरकार गरिबांचा पैसा काढून श्रीमंतांची घरे भरित आहे! : खा. राहुल गांधी

नांदेड: युपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे दर आजच्या पेक्षा अधिक असतानाही पेट्रोल डिझेलचे दर मात्र आजच्या तुलनेत कमी होते. आज कच्च्या तेलाचे दर कमी असतानाही पेट्रोल, डिझेलचे दर जास्त आहेतच; किंबहुना ते रोजच वाढत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढवून मोदी सरकार गरिबांच्या खिशातला पैसा काढून देशातील निवडक धनदांडग्यांची घरे भरित आहे, अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केली आहे.

खा. राहुल गांधी यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड येथे जाऊन धानसंशोधक कृषीभूषण स्व. दादाजी खोब्रागडे यांना श्रध्दांजली अर्पण केली व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी या परिसरातील शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना काँग्रेस अध्यक्षांनी भाजप सरकारवर घणाघात केला. मोदी सरकारने 15 उद्योगपतींचे अडीच लाख कोटींचे कर्ज माफ केले. जर हे सरकार या देशातील फक्त 15 निवडक लोकांना इतका पैसा देऊ शकते, तर मग हे सरकार या देशातील शेतक-यांनाही पैसे देऊ शकते. पण मोदी सरकारची शेतक-यांना पैसे देण्याची दानत नाही, असा हल्लाबोल करून केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यावर शेतक-यांना मदत केली जाईल, त्यांच्या हक्काचा पैसा दिला जाईल असा शब्द काँग्रेस अध्यक्षांनी शेतक-यांना दिला.

दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले होते. त्याची आठवण करून देत काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, सरकारी बँकांनी निरव मोदीला 35 हजार कोटी रूपये दिले. काँग्रेस सरकारने एवढीच रक्कम मनरेगा योजनेवर खर्च केली होती आणि त्यातून कोट्यवधी लोकांना रोजगार मिळाला होता मात्र निरव मोदीने 35 हजार कोटी रूपये घेऊन किती लोकांना रोजगार दिला? हे पंतप्रधान नरेंद्र मोदी का सांगत नाहीत. अशीही विचारणा राहुल गांधी यांनी केली.

दादाजी खोब्रागडे यांच्याबद्दल ऐकले तेव्हा त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मदत केली पाहिजे म्हणून मी येथे आलो. दादाजी खोब्रागडे यांना या सरकारने फक्त 5 कोटी रूपये दिले असते तर त्यांनी त्यातून 50 हजार लोकांना रोजगार दिला असता. दादाजी खोब्रागडे यांच्याप्रमाणेच अनेक ज्ञानी आणि प्रतिभावान लोक या देशात आहेत. जर सरकारने त्यांना मदत केली, राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांना पैसे दिले आणि त्यांना उद्योग उभारण्याची संधी मिळाली तर त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो. परंतु सरकार अशा लोकांना मदत करत नाही. मोदींना निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण करता आलेले नाही. या सरकारची नियतच साफ नाही, अशीही तोफ काँग्रेस अध्यक्षांनी डागली.

आज देशातील शेतकरी संकटात आहे, भीतीच्या सावटाखाली आहे. या शेतक-यांना आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वास सरकारने दिला पाहिजे. सरकारने शेतक-यांचे कर्ज कमी करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. सरकार शेतक-यांना पैसा देऊ शकते. कर्नाटक आणि पंजाबमधील काँग्रेस पक्षाच्या सरकारांनी शेतक-यांना कर्जमाफी देऊन पाठबळ दिले आहे. शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग प्रत्येक जिल्ह्यात उभारले तर शेतक-यांच्या मालाला योग्य दर मिळेल. मी तुम्हाला 15 लाख रूपये देण्याचे आश्वासन देणार नाही. पण मी आणि काँग्रेस पक्ष सदैव तुमच्यासोबत आहोत, हा विश्वास देण्यासाठी मी येथे आलो आहे. तुम्ही केव्हाही आवाज द्या, तुमच्यासाठी धावून येईल असे सांगून खा. राहुल गांधी यांनी उपस्थित शेतक-यांची मने जिंकली.

यावेळी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे 2.5 लाख रूपये, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून 5 लाख, आ. यशोमती ठाकूर यांच्याकडून 1 लाख, माजी खा. नरेश पुगलीया यांच्याकडून 1 लाख रूपये मदत व कुटुंबातील एका सदस्याला नोकरी दिली जाईल अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली. या मदतीच्या रकमेचे धनादेश काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते खोब्रागडे कुटुंबियांना देण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ.विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव आ. यशोमती ठाकूर, माजी खा. नरेश पुगलिया, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी खा. नाना पटोले, प्रवक्ते अतुल लोंढे, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नंदू नगरकर यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.