Published On : Sat, Feb 27th, 2021

महापौरांनी जाणून घेतली कोरोना रुग्णसेवेतील यंत्रणेची माहिती

Advertisement

मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयाला आकस्मिक भेट

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा कशी काम करत आहे, हे जाणून घेण्यासाठी आणि बघणायासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी शनिवारी (ता. २७) सकाळी मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात भेट दिली.

महापौरांनी या रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित रुग्णांबद्दल माहिती घेतली. याच रुग्णालयात फ्रंट लाईन वर्कर्सना कोरोना प्रतिबंधक लसही दिली जात आहे. या लसीकरण मोहिमेला आरोग्य सेवकांचा, फ्रंट लाईन वर्कर्स यांचा चांगला प्रतिसाद भेटत असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी महापौरांना दिली. . रुग्णालयातील डिजिटल एक्स-रे, अर्पण रक्तपेढी आणि रुग्णांच्या देखभालीविषयी माहिती देतानाच रक्त संकलनासाठी रक्तपेढीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

इंदिरा गांधी रुग्णालयात कोरोनाबाधीत २८ रुग्ण दाखल आहेत. कॅमेरा सर्व्हिलन्सच्या माध्यमातून कोव्हिड वॉर्डात दाखल रुग्णांची माहिती त्यांनी घेतली. रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी ज्या पद्धतीने रुग्णांची काळजी घेतात, त्याबद्दल रुग्णांनी महापौरांजवळ गौरवोद्‌गार काढले. रुग्णांना देण्यात येणाऱ्या भोजन व्यवस्थेत थोडी सुधारणा करण्याची सूचनाही रुग्णांनी केली.

इंदिरा गांधी रुग्णालयातल बंद ओ.पी.डी. सुरू करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यादृष्टीने महापौरांनी माहिती घेतली असता तिथे सध्या लसीकरणाचे काम होत असल्यामुळे पर्यायी व्यवस्था होईपर्यंत ओ.पी.डी. सुरु होणे अवघड असल्याचे संबंधितांनी सांगितले. महापौरांनी कोरोना तपासणी बद्दलही माहिती घेतली. या वेळी धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, आरोग्य समितीचे संजय महाजन, नगरसेवक अमर बागडे, संजय बंगाले, परिणिता फुके, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ संजय चिलकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ विजय जोशी उपस्थित होते.