Published On : Sat, Mar 6th, 2021

राजे बख्त बुलंद शाह यांच्या समाधीस्थळाची महापौरांनी केली पाहणी

नागपूर : गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या सक्करदरा येथील समाधी स्थळाला महापौर दयाशंकर तिवारी यांनी शुक्रवारी (ता.५) पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत बख्त बुलंद शाह यांचे वंशज वीरेंद्र शाहू, राष्ट्रीय आदिवासी आयोगाच्या सदस्या तथा माजी महापौर माया इवनाते, महिला व बाल कल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, नगरसेवक प्रमोद कौरती यांच्यासह समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सक्करदारा येथील तिरंगा चौकानजीक गोंड राजे बख्त बुलंद शाह यांचे समाधी स्थळ जीर्णावस्थेत आहे. सदर ठिकाणी साफसफाई व्यवस्थित नसल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. गोंड राज्यांच्या समाधी स्थळाची डागडुजी आणि त्याचे नूतनीकरण करण्यासंदर्भात हेरिटेज समितीकडे प्रस्ताव पाठवून समितीच्या निर्धारित वास्तू शिल्पकारकडून प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

स्थानिक नगरसेविका तथा महिला बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे यांनी सांगितले की गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या समाधीच्या सौंदर्यीकरणा संदर्भात 1.15 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. गोंड राजांच्या इतिहास नव्या पिढी पर्यंत पोहचावा या दृष्टीने सदरस्थळी ई म्युझियमचा प्रस्तावही देण्यात आला असल्याचे सांगितले.

सदर प्रस्ताव हेरिटेज समितीच्या वास्तू शिल्पकाराच्या निदर्शनास आणून या संदर्भात समितीच्या निर्देशानुसार मनपाच्या आगामी अर्थसंकल्पात निधी पारित करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.