Published On : Sat, Feb 23rd, 2019

विदर्भामुळे मराठी रंगभूमीला स्थैर्य

नागपूर: स्वातंत्र्योत्तर काळात साठव्या दशकात मुंबई प्रांतात नाटकांवर कर लादला जात होता. त्यामुळे नाटकांची दैन्यावस्था झाली होती. मात्र, मराठी रंगभूमीला चांगले स्थैर्य मिळाले ते केवळ विदर्भामुळेच, असे नमूद करीत अ. भा. मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

अ. भा. मराठी नाट्य संमेलनाच्या उद्‌घाटनात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या आई-वडिलांनी 1949 मध्ये सुरू केलेल्या नाट्य कंपनीद्वारे निर्मित नाटकांचा काळ डोळ्यापुढे उभा करीत त्यांनी विदर्भाने केलेल्या मदतीचे भरभरून कौतुक केले. त्या म्हणाल्या, मुंबईत नाटकांची दैन्यावस्था होत असताना विदर्भ व मराठवाड्याने भक्कम पाठिंबा दिला. त्यावेळी हैदराबाद येथे नाटक सादर केल्यानंतर तेथील एका अधिकाऱ्याने त्याचे ऊर्दू रूपांतरासाठी आग्रह धरला. मात्र, तेथील एका थिएटरमालकाने मदत केली. तेथून चंद्रपूरला आल्यानंतर जयंत टॉकीजमध्ये नाटकांचे प्रयोग झाले. येथे नाटकातून चांगले उतन्नही मिळाले.

Advertisement

शेतकऱ्यांनी धान्य दिले. त्यामुळे विदर्भात गावागावांत नाटकांचे प्रयोग झाले. एका गावात नाटकासाठी मुक्काम असताना नाटकाचा शामियाना वादळाने उडाला. त्यावेळी नागपूरचे श्रीमंत बाबूराव देशमुख यांनी दोन हजार रुपयांची मदत केली. असे दिलदार हृदय विदर्भाचे आहे. येथील वृत्तपत्रांनीही मदत केली. चांगल्या माणसाठी विदर्भ नेहमीच धावून आला. विदर्भ, मराठवाडा पाठीशी होता, म्हणून नाटक जिवंत राहिले, असेही त्या म्हणाल्या. संमेलनाध्यक्षा म्हणून नाट्य परिषदेच्या विविध शाखांना भेटी दिल्या. अनेक नवे कलावंत घडत असल्याचे दिसून आले. नवी पिढी हुशार असून त्यांना रसिकांच्या शाबासकीची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. यानंतर त्यांनी संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्याकडे सोपविली.

Advertisement

नागपुरातून नाटकांना प्रोत्साहन मिळेल
नागपुरात अनेक दर्जेदार नाटकं व्हायची. यात डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांच्या नाटकांचा समावेश होता. पण, मधल्या काळात ते बंद झाले. मात्र, आता नागपुरात नाटकांसाठी सुरेश भट सभागृह आहे. त्यामुळे नागपुरातून नाटकांना मोठे प्रोत्साहन मिळेल, असा विश्‍वास केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी सरकारने प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृहे बांधावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

अ. भा. मराठी नाट्य संमेलनाच्या उद्‌घाटन समारंभात ते स्वागताध्यक्ष म्हणून बोलत होते. मराठी नाटक महाराष्ट्राचा अभिमान असल्याचे नमूद करीत ते म्हणाले, मुंबईत असताना अनेक दर्जेदार नाटके बघण्याची संधी मिळाली. मात्र आता दिल्लीत गेल्यामुळे नाटक बघता येत नाही. नाटकातून मराठीचे वैभव वाढले. मराठी साहित्य, संस्कृती, नाट्य याचे महत्त्व महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहून कळत नाही. ज्यावेळी इतर राज्यात जातो, त्यावेळी मराठी नाटक, संस्कृती, सहित्य किती श्रेष्ठ आहे याची माहिती मिळते. आज मराठी नाटकांबाबत नेहमीच प्रत्येक जिल्ह्यात हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह बांधले पाहिजे, असे सरकारला नेहमीच सुचवित आलो आहे. त्यामुळेच नागपुरात सुरेश भट सभागृह बांधले. आयुक्तांनी एक लाख रुपये भाडे ठरविले होते.

त्यांनी विजेचा खर्चच 80 हजार रुपये येईल, असे सांगितले. त्यामुळे भट सभागृहावर सौर ऊर्जा संयंत्र बसविले. नागपुरातील सांस्कृतिक कार्याला प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य आहे, याचा व्यावसायिक हिशेब करू नका, असे महापौर व आयुक्तांना सांगितले. अशाप्रकारच्या सुविधा मिळाल्या तर मराठी नाटकाला नक्कीच चांगले दिवस येतील. राज्य सरकारही याचा विचार करेल. येणाऱ्या काळात उत्तम कलाकृतीला जनतेचे अन्‌ सरकारचेही सहकार्य मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. जुन्या प्रत्येक नाटकातून एक संदेश दिला जात होता. समाजाच्या भविष्यनिर्मितीसाठी आवश्‍यक संदेश देणे आवश्‍यक आहे. यात कलावंत, लेखक, दिग्दर्शकाचे मोठे योगदान आहे, असेही ते म्हणाले.

कलावंतांच्या प्रतिक्रिया
अभिनेता भरत जाधव- बऱ्याच वर्षांनंतर नागपुरात होत असलेल्या नाट्यसंमेलनात सहभागी होणे ऐतिहासिक आहे. मुख्य म्हणजे नागपूरकरांचा सहभाग पाहण्यासारखा आहे. नाटकावर प्रेम करणारी, कलावंतांवर जीव ओवाळणारी ही मंडळी नाट्यदिंडीमध्ये सहभागी होऊन पायी चालत आहे, हे खरेच अवर्णनीय आहे.
अभिनेता वैभव मांगले- संमेलनात सहभागी होणे वैयक्तिकरित्या माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. रंगकर्मी आणि रसिकांच्या सहकार्याने संमेलन यशस्वी होईल, असा विश्वास आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण – संमेलनात सहभागी होणे आनंदाची गोष्ट आहे. सामान्यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. केंद्रीय मंत्री गडकरींच्या प्रयत्नामुळे इतक्या वर्षांनंतर नागपुरात संमेलन होत असल्याचा आनंद आहे. संमेलनाच्या माध्यमातून कलावंतांना मिळणारे मानधन वाढविण्याचा मुद्दा मार्गी लागायला हवा, अशी अपेक्षा आहे.

अभिनेता प्रदीप काबरा- राज्याच्या उपराजधानीत सुंदर असा सोहळा रंगलेला पाहतो आहे. अनेक वर्षांनंतर होणाऱ्या संमेलनाच्या दिंडीमध्ये सहभागी झालेले नाट्यप्रेमी आणि त्यांचा उत्साह अभिमानास्पद आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमुळे हे शक्य झाले आहे. तरुणांचा जोशदेखील बरेच काही बोलून जात आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर- नाट्यसंमेलन नेहमीच चांगले होत आले आहे. रंगकर्मींसाठी हा आनंदाचा सोहळा आहे. या माध्यमातून रंगकर्मी, रसिक एकत्र आहेत. नावीण्यपूर्ण कार्यक्रम होतात. संमेलन होत असलेल्या प्रदेशाचा सांस्कृतिक विकास याद्वारे होतो.

दिग्दर्शक केदार शिंदे- नाट्यदिंडीतील उत्साह, जल्लोश पाहून ‘अप्रतिम’ असेच वर्णन करायला हवे. विदर्भावर अन्याय झाला असे नेहमी म्हटले जाते. पण, प्रत्यक्षात रंगकर्मींद्वारे कधीही असा प्रकार घडलेला नाही. रंगकर्मींनी विदर्भाला कधीच डावलले नाही. आजचा हा उत्साह त्याचीच पावती आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधान – नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच नागपुरात आल्याने फार जास्त उत्साहित आहे. येथील रंगकर्मी, रसिकांशिवाय सामान्य नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद, दिंडीतील त्यांचा सहभाग उत्साहवर्धक आहे. दिंडीमध्ये सहभागी होण्याचा आनंदच वेगळा आहे.

लेखक अभिजित गुरू – नागपुरात, माझ्या शहरात संमेलन होत असल्याचा आनंद मोठा आहे. इतक्या वर्षांनंतर होत असलेल्या संमेलनाचा मीदेखील एक भाग असल्याचा आनंद शब्दात न मावणारा आहे. माझ्यासह माझे जुने रंगकर्मी मित्र, नातेवाइकसुद्धा संमेलनाचा आनंद घेणार आहेत.

अभिनेता संदीप पाठक – झाडीपट्टी ही विदर्भाची ओळख आहे. संमेलनाच्या निमित्ताने झाडीपट्टी रंगभूमीचा विकास व्हावा, तेथील कलावंतानाही सन्मान मिळायला हवा. संमेलनातून नाटक, रंगभूमी हे सर्व ग्रामीण भागापर्यंत, दुर्गम परिसरात झिरपायला हवे.

अभिनेता अविनाश नारकर- दिंडीतील सर्वसामान्यांचा सहभाग उत्साह वाढविणारा आहे. मागील वर्षापासून नाट्य परिषद चांगले कार्य करत आहे. तरुणांना, नव्या विचारांना सोबत घेऊन जाण्याचा मानस आहे. त्यादिशेन कार्यकारिणीचे कार्य सुरू आहे. रंगभूमीच्या सर्व अंगांना स्पर्श करत संमेलन यशस्वी करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

अभिनेत्री मधुरा वेलणकर – दिंडीतील लोकनृत्य पाहून आनंद वाटला. प्रत्येक प्रदेशाची स्वत:ची स्वतंत्र ओळख असते. ती संस्कृती लोकमाध्यमातून दिसत असते. नागपूरातील नाट्य संमेलनामध्ये आढळलेली लोकसंस्कृती आनंददायी आहे. येथून चांगले आणि सकारात्मक विचार घेऊन जाणार.

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement