Published On : Sat, Jun 30th, 2018

उपराजधानीत सर्वात लांब उड्डाणपूल

Advertisement

नागपूर: नागपूर शहराची लोकसंख्या वाढत चालली असून ३० लाखांवर पोहोचली असता शहराचा विस्तार होत आहे. वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे वाहनांची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळे वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी शहरात उड्डाणपूल बनवले असून आणखी एक उड्डाणपूल बनवण्यात येत आहे. हा उड्डाणपूल उपराजधानीतील सर्वात लांब असून ३.९६ किलोमीटरचा राहणार आहे. क्रीडा संकुल ते एलआयसी चौकादरम्यान होत असून छावणी चौकातून काटोल रोडकडे या पुलास वळते करण्यात आले आहे. या पुलाच्या बांधकामासाठी तब्बल २१८.११ कोटी खर्च होणार आहेत. विशेष म्हणजे, केंदीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हा रास्ता तयार करीत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून नागपूरला वाहतूक कोंडीचा विळखा बसला आहे. नागपुरातून जबलपूर, छिंदवाडा, अमरावती, वर्धा, चंद्रपूर असे मुख्य मार्ग जात असून या मार्गांवरून दररोज वाहनांची मोठी ये-जा सुरु असते. या वाहनांचा आकडा मोठा असल्याने शहरातील वाहतुकीवर त्याचा प्रचंड ताण पडत आहे. शहरातील महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली तर त्याचा परिणाम अंतर्गत रस्त्यांवर होतो. भविष्यात वाहनांच्या संख्येत होणारी वाढ आणि त्या तुलनेत रस्ते तसेच उड्डाणपुलांचे नियोजन पूर्वीच करणे आवश्यक आहे.

छिंदवाडा मार्ग हा सदर भागातून येत असून या मार्गावर नेहमीच वाहनांची कोंडी होते. त्यामुळे विभागीय क्रीडा संकुलनातून ते थेट एलआयसी चौकापर्यंत ३.९६ किमीचा उड्डाणपूल तयार करण्यात येत आहे. या पुलाचे बांधकाम मेसर्स केसीसी बिल्डकॉन प्रा. लिमिटेडमार्फत सुरु असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या देखरेखीत करण्यात येत आहे. या उड्डाणपुलाचे बांधकाम २९ मार्च २०१७ पासून सुरु झाले. या पुलासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिला असून पुलाचे बांधकाम २८ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. या दृष्टीने उड्डाणपुलाचे बांधकाम जलद गतीने सुरु असून वेळेवर पूर्ण होण्याची अपेक्षा केली जात आहे.