Published On : Tue, Feb 26th, 2019

‘विधी अधिकारी’ पद उपायुक्त पदाकरिता असलेल्या पदोन्नती साखळीमध्ये समाविष्ट करणार

Advertisement

महापालिका विधी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित सेवा भरती व पदोन्नती नियमावलीमध्ये विधी अधिकारी हे पद उपायुक्त पदाकरिता असलेल्या पदोन्नती साखळीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला विधी समितीने मंजुरी दिली असून पुढील कार्यवाहीसाठी महापालिकेच्या महासेभेपुढे प्रस्ताव पाठविला आहे.

सोमवारी (ता.२५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात विधी समितीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, विधी समिती सदस्य अमर बागडे, सहायक आयुक्त महेश धामेचा, अभियोक्ता व्यंकटेश कपले, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेश रहाटे प्रामुख्याने उपस्थित होते.

आंतर महानगरपालिका, नगरपरिषद, शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये बदलीकरिता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमान्वये महाराष्ट्र शासनाच्या निर्गमित केलेल्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेच्या विधी विभागामार्फत कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीद्वारे नियुक्तीसंदर्भात नियमावली तयार करण्यात आली आहे. या बदली धोरणासंदर्भात धोरण व नियमांची प्रत सर्व सदस्यांना वितरीत करून त्यांनी सुचविलेल्या सूचना व दुरुस्त्यांसह मंजुरी देण्याचेही निर्देश विधी समिती सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

या बैठकीमध्ये रमाई घरकुल आवास योजनेचा आढावा समिती सभापती धर्मपाल मेश्राम यांनी घेतला. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार ११३५ अर्ज मंजूर तर ११०९ अर्ज नामंजूर झाले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजेश रहाटे यांनी दिली. महापौरांच्या बैठकीत सुचविलेल्या संचयनी कॉम्लेक्सच्या संदर्भात असलेल्या विषयांवर यावेळी बैठकीत चर्चा झाली.

महापालिकेद्वारे होणारे त्रिपक्षीय करार व सामंजस्य करार हे कायदेशीररित्या सक्षम प्राधिकरनापूढे नोंदणीकृत करण्यासाठी लीगल फर्म मार्फत एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविण्याचे निर्देश सभापती धर्मपाल मेश्राम यांनी दिले.