Published On : Mon, Sep 9th, 2019

त्रिमूर्तीनगर येथील अग्निशमन केंद्र व ‘तेजस्विनी बस’चे लोकार्पण आज

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. ३६ अंतर्गत त्रिमूर्तीनगर जलकुंभजवळ रिंग रोड, भामटी येथे उभारण्यात आलेल्या त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्राचे तसेच खास महिलांच्या सुविधेसाठी मनपाच्या परिवहन ताफ्यात दाखल होणा-या इलेक्ट्रिकवरील ‘तेजस्विनी बस’ सेवेचे उद्या मंगळवारी (ता.१०) सायंकाळी ५.३० वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.

त्रिमूर्तीनगर जलकुंभजवळील अग्निशमन केंद्राच्या परिसरात आयोजित समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. महापौर नंदा जिचकार समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवितील.

याप्रसंगी खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार नागो गाणार, आमदार प्रकाश गजभिये, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार सुधाकर देशमुख, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, बसपाच्या पक्षनेत्या वैशाली नारनवरे, राकाँचे पक्षनेते दुनेश्वर पेठे, शिवसेना पक्ष नेते किशोर कुमेरिरया, परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, अग्निशमन समिती सभापती ॲड. संजयकुमार बालपांडे, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, माजी महापौर प्रवीण दटके, अग्निशमन समिती उपसभापती निशांत गांधी, नगरसेविका मिनाक्षी तेलगोटे, नगरसेविका पल्लवी श्यामकुळे, नगरसेवक लहुकुमार बेहते, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक राजेश मोहिते, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांची प्रमुख उपस्थिती असेल.

कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी व महिलांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

महिला सक्षमीकरण व महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपाच्या ‘आपली बस’च्या ताफ्यात महिलांसाठी विशेष इलेक्ट्रिकवर संचालित ‘तेजस्विनी बस’ दाखल झाली असून उद्या मंगळवार(ता.१०)पासून शहरातील महिलांच्या सुविधेसाठी सुरू होणार आहे. ‘तेजस्विनी बस’च्या खरेदीसाठी मनपाला राज्य शासनाकडून ९.२५ टक्के अनुदान प्राप्त आहे. सहा नवीन ग्रीन बस परिवहन सेवेमध्ये दाखल होत असून त्यापैकी पाच बस मनपा परिवहन विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत.

नागपुरातील सुमारे ७२ हजार महिला दररोज सार्वजनिक वाहतूक सेवेचा उपयोग करतात. महिलांसाठीच्या या विशेष पाच बसमुळे दररोज सुमारे तीन हजार महिलांना लाभ होणार आहे. पाचही ‘तेजस्विनी बस’ शहरातील पाच वेगवेगळ्या मार्गावर सेवा देतील. मनपाच्या ‘मी जिजाऊ’ योजनेंतर्गत शहरातील शहिद जवानांच्या कुटुंबियांना कार्ड प्रदान करण्यात येणार आहे. या कार्डवर शहिद कुटुंबातील पत्नी, आई, बहिण यापैकी कुणाही एकाला मोफत प्रवास सेवा दिली जाणार आहे.

इलेक्ट्रिकवरील ‘तेजस्विनी बस’साठी मनपातर्फे शहरात विविध ठिकाणी सहा चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. ‘तेजस्विनी बस’ची प्रति बस १.४९४ कोटी एवढी किंमत असून प्रति किमी ४२.३० रुपये एवढे दर निश्चीत करण्यात आले आहे.