Published On : Mon, Sep 9th, 2019

हुडकेश्वर-नरसाळा पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण आज

नागपूर : महाराष्ट्र शासन व नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या हुडकेश्वर-नरसाळा पाणी पुरवठा योजनेचे उद्या मंगळवारी (ता.१०) सायंकाळी पाच वाजता राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. प्रभाग क्र. २९ हुडकेश्वर येथील चंद्रभागानगर जलकुंभ येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील.

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार नागो गाणार, आमदार प्रकाश गजभिये, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार सुधाकर देशमुख, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, बसपाच्या पक्षनेत्या वैशाली नारनवरे, राकाँचे पक्षनेते दुनेश्वर पेठे, शिवसेना पक्ष नेते किशोर कुमेरिरया, जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटु) झलके, उपसभापती भगवान मेंढे, हनुमान नगर झोनच्या सभापती माधुरी ठाकरे, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, नगरसेविका लीला हाथीबेड, नगरसेविका विद्या मडावी, नगरसेविका स्वाती आखतकर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर उपस्थित राहतील.

हुडकेश्वर-नरसाळा क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा योजना राबविण्याकरीता ६३.०५ कोटीचे विस्तृत प्रकल्प अहवाल मनपातर्फे तयार करण्यात आले असून यामध्ये राज्य शासनाकडून ८० टक्के (५०.४४ कोटी) व मनपाकडून २० टक्के (१२.६१कोटी) खर्च आहे. या प्रकल्प अहवालास राज्य शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. प्रकल्प अहवालामध्ये करावयाच्या कामाचे चार भाग करण्यात आले आहेत. पहिल्या भागात ६०० मी.मी. व्यासाची फिडरमेन्स टाकणे (१०.१७कोटी), दुस-या भागात हुडकेश्वर व नरसाळा येथे प्रत्येकी दोन जलकुंभाचे बांधकाम (९.३८कोटी), तिस-या भागात मौजा हुडकेश्वर येथे वितरण नलिका टाकणे (१८.४७कोटी) व चौथ्या भागात मौजा नरसाळा येथे वितरण नलिका टाकणे (१८.७०कोटी) अशा एकूण ५६.७२ कोटीच्या कामांचा समावेश आहे.