Published On : Fri, Jun 28th, 2019

दर तासाला मेट्रो सेवेचा शुभारंभ, नागपूर मेट्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Advertisement

महा मेट्रो तर्फे फुल व मिठाई वाटून प्रवासी नागरिकांचे स्वागत

मेट्रो ट्रेनचे क्रॉसिंग दरम्यान टाळ्याचा कडकडाट

नागपूर : महा मेट्रो नागपूरच्या दर तासाला मेट्रो प्रवासी सेवेचा तसेच अप लाईन मार्गिकेवर च्या मेट्रो सेवेचा शुभारंभ आज करण्यात आला. सकाळी ८.०० वाजता पासून पहिली फेरी सिताबर्डी येथून खापरी स्टेशनच्या दिशेने रवाना झाली तसेच त्याचवेळी खापरी मेट्रो स्टेशन येथून ही मेट्रो ट्रेन सिताबर्डी इंटरचेंज स्टेशन करता निघाली. महा मेट्रोच्या वतीने नागरिकांना फुल व मिठाई वाटून प्रवाश्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच त्यांना मेट्रो सेवा व महा कार्ड संदर्भात माहिती प्रदान करण्यात आली. याशिवाय मेट्रो स्टेशन येथे कार्यरत प्रत्येक कर्मचाऱ्याला देखील मिठाई वाटून शुभेच्छा देण्यात आल्या. सिताबर्डी व खापरी येथून एकाच वेळी निघालेल्या दोन्ही मेट्रो ट्रेन छत्रपती चौक येथे क्रॉस झाले असता प्रवाश्यांनी टाळ्या वाजवित आनंद व्यक्त केला.

महा मेट्रो तर्फे संचालक (रोलिंग स्टॉक) श्री.सुनील माथुर, संचालक (वित्त) श्री.एस शिवमाथन,महाव्यवस्थापक (प्रशासन) श्री.अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक (ओ अँड एम) श्री. सुधाकर उराडे,कार्यकारी संचालक (रिच-१) श्री. देवेंद्र रामटेक्कर,महाव्यवस्थापक (ट्रॅक) श्री. गुरबानी प्रामुख्याने उपस्थित होते.

खापरी मेट्रो स्टेशन पर्यंतच्या प्रवासा दरम्यान प्रवाश्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना ज्येष्ट नागरीक सुभाष कौशीकर यांनी सांगितले कि : आज आपल्या नागपूर मेट्रोचा मला कौतुकचं नाही तर स्वाभिमान वाटतोय. नागपूर मेट्रोने आज प्रवास करतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. नागपूरचे सौंदर्य वरून बघण्याची आज संधी आम्हाला मिळाली याचे समाधान असल्याचे ते म्हणाले.

(लक्ष्मीचंद मेंढे : तरुण प्रवासी) : तरुण पिढीनी जास्तीत जास्ती मेट्रोचा प्रवास करायला पाहिजे,मेट्रो प्रवास हा सुरक्षित असून नागपूर मेट्रोने प्रवास करतांना एक सुखद अनुभव आल्याचे ते म्हणाले.

(गृहिणी) : आज नागपूर मेट्रोने प्रवास करतांना अतिशय आनंद होत आहे, हा प्रकल्प तयार होतांना बघितले होते पण आज प्रत्यक्षात प्रवास करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. नागपूर मेट्रो प्रकल्प इतर मेट्रो पेक्षा नव्कीच चांगला आहे व नागपूरकरांना खूप लवकर मेट्रो सेवा मिळाली याचा विश्वास आहे.

अनिल कोकाटे (महाव्यवस्थापक – प्रशासन, महा मेट्रो) : माध्यम प्रतिनिधीशी चर्चा करतांना सांगितले की, बऱ्याच दिवसांपासुन प्रवासी नागरिकांनी मेट्रोच्या फेऱ्या मध्ये वाढ करण्या संदर्भात मागणी केली होती जे की आज प्रत्यक्षात पूर्ण होत आहे.व लवकरच जय प्रकाश नगर आणि राहटे कॉलोनी मेट्रो स्टेशन येथून प्रवासी सेवा सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस आहे असल्याचे म्हणाले.