Published On : Tue, Jul 3rd, 2018

सरकारची अंतिम तारीख ठरली आहे – विखे पाटील

Advertisement

392025-vikhe-patil

नागपूर : गेल्या चार वर्ष्याच्या कार्यकाळात या सरकारने केवळ घोषणाबाजी केली असून, या सरकारच्या खोटारड्यापणाला राज्यातील जनता वैतागली आहे. या सरकारची अंतिम तारीख जवळ आलेली असून येत्या विधानसभेच्या निवडणुकीत ही जनता सरकारला खालती खेचल्याशिवाय राहणार नाही. असा कडक इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. उद्यापासून नागपुरात सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत विखे पाटील यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

यावेळी विखे पाटील म्हणाले की, मी १९९५ सालापासून विधानसभेत सदस्य म्हणून काम करत आहो. कुठल्याही अधिवेशनाची सुरुवात ही सोमवारपासून होत असते, मात्र हे सरकार मुहूर्त काढून अधिवेशन सुरु करत आहे. अधिवेशनाची सुरुवात सोमवार पासून न करता बुधवारपासून होणार आहे. या सरकारमध्ये जनतेचे कुठलेही प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती नाही. हे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. केवळ पोकळ घोषणा देऊन या सरकरने जनतेचा विश्वासघात केला आहे. राज्यातील जनतेने याआधी असे कुठलेही खोटारडे सरकार बघितले नाही. असा आरोपही पाटील यांनी केला.

या सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून, कर्जमाफी तर सोडाच खरिपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या मोबदल्यात बँकेचे अधिकारी शरीरसुखाची मागणी करत आहे. ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारी आहे. मागील एक वर्षात जवळपास २७०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, या सरकारने याची कुठलीही दखल घेतली नाही.

कोकणात प्रस्तावित असलेल्या नाणार प्रकल्पावरून शिवसेनेची आब्रू गेली असून, त्यांच्या खिशातील राजीनामे कुठे गेले असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. हे सरकार केवळ बिल्डरांना लाभ पोहचवण्यात व्यस्त आहे हे मुंबईच्या भूखंड घोटाळ्यावरून सिद्ध होत.

या घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांचा सहभाग असल्याचा पुरावा आमच्याकडे उपलब्ध असून, सभागृहात पुरावे सादर करून आम्ही सरकारला विचारणा करू अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच हे सरकार कुठल्याही बाबतीत यशस्वी न ठरल्याने आम्ही मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार घालत असल्याचेही विखे पाटील म्हणाले.