
Ashwin Mudgal
नागपूर: शहर विकासात तांत्रिक ज्ञान असलेल्या अधिकाऱ्यांची नेहमी गरज असते. अशावेळी महेश गुप्ता यांच्यासारखा तांत्रिक ज्ञान असलेला अधिकारी सेवानिवृत्त होतो त्यावेळी प्रशासनाला त्याची उणीव भासते, असे गौरवोद्गार महानगरपालिकेचे आय़ुक्त अश्विन मुदगल यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता महेश गुप्ता यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या निरोप समारंभाप्रसंगी ते बोलत होते. अतिरिक्त आयुक्त डॉ.रामनाथ सोनवणे, उपायुक्त रवींद्र देवतळे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना आयुक्त म्हणाले, अनुभव असलेली व्यक्ती ज्यावेळी निवृत्त होते, त्यावेळी त्याची कमतरताही संस्थेला जाणवते. त्यातही तो व्यक्ती कर्तव्यदक्ष आणि हरहुन्नरी असेल तर त्याचा फटकाच संस्थेला बसतो. महेश गुप्तांमध्ये हे गुण होते. माझा त्यांचा संबंध फार थोडाच आला; पण जेवढा आला त्याकाळात त्यांच्यातील सर्व गुण मला दिसून आले. नागपूर महानगरपालिकेत त्यांच्या समवेत काम केलेल्या सर्व आयुक्तांनी नेहमीच त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. माणूस जोडणे ही त्यांची कला खूप शिकण्यासारखी असून ती त्यांच्या आयुष्याची जमापूंजी आहे, ती त्यांनी तशीच कायम ठेवावी. त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो, असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले.
अतिरिक्त आय़ुक्त सोनवणे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. महानगरपालिकेत त्यांना दिलेली सर्व जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभळली मग ती सीमेंटच्या रस्त्यांची असो वा स्मार्ट सिटीची, या सर्व जबाबदारी त्यांनी अगदी सहजतेने सांभाळली आहे. हिवाळी अधिवेशन नागपुरात दरवर्षी असते. नागपुरात येणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांसोबत समन्वयाचे काम हे गुप्तांकडेच असायचे. हे कामसुद्धा त्यांनी जबाबदारीने सांभाळले, त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो असे ते म्हणाले.
महेश गुप्ता यांच्यासोबत काम केलेले नागपूर महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी यावेळी त्यांना शुभेच्छा देत महानगरपालिकेत असे निवडक अभियंता आहे जे महापालिकेच्या सर्व विभागात काम करत असतात. महेश गुप्ता हे त्यातील एक होते. माझा सहकारी म्हणून काम करताना त्यांच्यापासून खूप काही शिकण्यासारखे आहे असे म्हणत त्यांच्या भावी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. मनपा पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकार मनीष सोनी आणि मनपा कंत्राटदार असोसिसएशनतर्फे अध्यक्ष विजय नायडू यांनी गुप्ता यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मनीष सोनी यांनी गुप्ता यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना महेश गुप्ता यांनी त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. कोणीही माझ्यावतीने दुःखावले असेल, मी अनावधानाने त्यांना काही बोललो असेल त्यांची माफी मागतो. ३७ वर्षाच्या सेवेत प्रत्येक अधिकारी शिकवून गेला. महानगरपालिकेने माझ्यावर जो विश्वास टाकला त्यावर मी खरा उतरलो याचा मला अभिमान आहे, असे भावोदगार त्यांनी काढले.
प्रारंभी महेश गुप्तांचा आयुक्तांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.
कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता डी.डी. जांभूळकर, कार्यकारी अभियंता सर्वश्री संजय गायकवाड, सी.जी. धकाते, कुकरेजा, सुनील भूतकर, उपअभियंता राजेश दुपारे, आत्माराम बोदेले, खोत, सुष्मा नायडू, ज्योती जाधव, आरती बोंतिलवार, ज्योती खोब्रागडे, यांच्या समवेत विभाग प्रमुख उपस्थित होते.
