Published On : Mon, Oct 29th, 2018

राज्यातील केंद्रीय रस्तेविषयक प्रश्न निकाली : ऊर्जामंत्री बावनकुळे

नागपूर: नागपूर शहर आणि जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील रस्ते विषयक प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत अनेक रस्त्यांच्या अपूर्ण कामे पूर्ण करण्याबाबतचे निर्णय झाले असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज महाराष्ट्र भवन दिल्ली येथे पत्रपरिषदेत दिली.

ना. गडकरींसोबतची बैठक दिल्लीतील परिवहन भवन येथे झाली. या बैठकीत राज्यातील रस्तेविषयक कामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, खा. विनायक राऊत, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, भाजपा नेते विकास तोतडे व केंद्रीय अधिकारी उपस्थित होते.

मनसर टोल नाका
नागपूर जिल्ह्यातील नागपूर रामटेक रस्त्यावरील मनसर टोल नाका नागपूर महानगर विकास प्राधिकरणातून (एनएमआरडीए) वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. हा टोल नाका आता खवासा सीमेकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. रामटेक दर्शनासाठी येणारे भाविक व शेतकर्‍यांना मोठा दिलासा या निर्णयामुळे मिळणार आहे. पाटणसावंगी टोल नाका बैतुलकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिली.


महालक्ष्मी मंदिर कोराडी
कोराडी महालक्ष्मी मंदिर भागात होत असलेल्या अपघाताच्या समस्येवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. अपघात स्थळांजवळ पुरेशा उपाययोजना करण्याच्या सूचना ना. गडकरी यांनी दिल्या. त्यामुळे हा विषय लवकरच मार्गी लागणार असल्याचेही ना. बावनकुळे म्हणाले. तसेच नागपूर सावनेर छिंदवाडा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण स्थळे मार्किंग करून त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

झिरो माईलपर्यंत राष्ट्रीय महामार्ग
नागपूर भंडारा, नागपूर काटोल-सावनेर, धापेवाडा, रामटेक तुमसर तसेच राज्यातील ज्या शहरांमधून राष्ट्रीय महामार्ग जातात, त्या शहरांच्या मध्यवर्ती भागापर्यंत (झिरो माईल) राष्ट्रीय महामार्ग बांधण्याच्या सूचना ना. गडकरी यांनी या बैठकीत अधिकार्‍यांना दिल्या. राष्ट्रीय महामार्ग हे शहराच्या सीमेपर्यंत बांधण्यात येत असत व पुढे त्याचे काम महापालिकांकडे सोपविण्यात येत असे. पण आता शहराच्या मध्यभागापर्यंत हे मार्ग बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील राष्ट्रीय महामार्ग शहरांच्या मध्यवर्ती भागांपर्यंत बांधण्याचे निर्देश ना. गडकरी यांनी दिले असल्याचेही ना. बावनकुळे म्हणाले.

या बैठकीत नागपूर जिल्ह्यातील उमरेड, काटोल, नागपूर उमरेड, वणी वरोरा या प्रस्तावित रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ टोल नाका, जालना जिल्ह्यातील चिखली तडसूद, नाशिक पुणे महामार्गावरील पाच बायपास तसेच टोल नाके आणि मुंबई गोवा महामार्ग अशा 24 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.