Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

  Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Sep 20th, 2019

  उपद्रव शोध पथकाने दोन वर्षांत केली २३९७० जणांवर कारवाई

  सर्वाधिक कारवाई विना परवानगी बांधकाम साहित्य ठेवणाऱ्यांवर

  नागपूर : नागरिकांनी नियमांचे पालन करावे आणि आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवावे. लोकसहभागातून शहराचे सौंदर्य वाढवावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिका सतत करीत असते. मात्र, तरीही काही व्यक्तींकडून नियमांचे उल्लंघन केले जाते. शहर विद्रूप करण्यात काही लोकं अग्रेसर असतात. अशा लोकांच्या वाईट सवयींवर निर्बंध घालण्यासाठी तीन वर्षांपूर्वी नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छता विभागांतर्गत उपद्रव शोध पथकाची नियुक्ती करण्यात आली. या पथकाने मागील तीन वर्षांत अशा २३ हजार ९७० व्यक्तींवर कारवाई केली आहे. या कारवाईद्वारे सुमारे अडीच कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

  उपद्रव शोध पथकांतर्गत ११ डिसेंबर २०१७ रोजी ४१ माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात आली. १६ सप्टेंबर रोजी पुन्हा ४६ माजी सैनिकांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. एक पथक प्रमुख, १० झोन स्क्वॉड लीडर आणि ७६ सिक्युरिटी असिस्टंट असे ८७ जणांचे उपद्रव शोध पथक शहर स्वच्छ राहावे आणि शहर विद्रूप होऊ नये, याची सतत काळजी घेत असतात. जिथे नियमांचे उल्लंघन होते तेथे पोहोचून संबंधितांना नोटीस जारी केली जाते. दिलेल्या वेळेच्या आत संबंधित व्यक्तीने कार्यवाही केली नाही तर त्या व्यक्तीवर दंड आकारण्यात येतो. उपद्रव शोध पथक निर्मितीच्या वेळी ठरविण्यात आलेली दंडाची रक्कम ३ एप्रिल २०१८ पासून दुप्पट करण्यात आली आहे. यामुळे शहरातील नागरिकांना शिस्त लागण्यात मदत होत असल्याचे दिसून येते.

  मोकळ्या जागांवर बांधकाम साहित्य ठेवणाऱ्यांकडून आकारला सर्वाधिक दंड
  नागपूर महानगरपालिकेच्या महासभेने ठरविल्यानुसार विविध २१ उपद्रवासाठी उपद्रव शोध पथकाकडून दंड आकारण्यात येतो. यापैकी सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी विनापरवानगी बांधकाम साहित्य साठविणाऱ्यांकडून नोटीस दिल्यावरही ४८ तासांत ते न हटविल्याप्रकरणी आतापर्यंत एक कोटी १८ लाख ७८ हजार इतका दंड आकारण्यात आला आहे. त्याखालोखाल यादीत नसलेल्या इतर उपद्रवापोटी २३ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

  याव्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून ७८ हजार ५०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर लघवी करणाऱ्यांकडून एक लाख ९४ हजार ३००, हातगाड्या, स्टॉल्सवाल्यांकडून परिसरात अस्वच्छता करणाऱ्यांकडून नऊ लाख ६३ हजार ९०० रुपये, रस्ता, फुटपाथ, मोकळ्या जागांवर कचरा टाकणाऱ्यांकडून ३९ हजार रुपये, फुटपाथ, मोकळ्या जागांवर कचरा टाकणाऱ्या दुकानदारांकडून पाच लाख ३२ हजार ६०० रुपये, रस्ता, मोकळ्या जागांवर कचरा टाकणाऱ्या शैक्षणिक संस्थांनाकडून पाच लाख ६० हजार रुपये, दवाखाने, इस्पितळांकडून एक लाख ९१ हजार, मॉल, उपहारगृहे, लॉजींग, बोर्डिंग हॉटेल्स, थिएटर, मंगल कार्यालये, कॅटरर्स यांच्याकडून नऊ लाख ८८ हजार रुपये, विनापरवानगी शहरात जाहिरात फलक लावणाऱ्यांकडून ३६ हजार ५०० रुपये, रस्त्यावर मंडप टाकणाऱ्यांकडून सहा लाख ६५ हजार ३०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधणाऱ्यांकडून एक लाख ४१ हजार रुपये, कचरा मोकळ्या जागांवर टाकणाऱ्या चिकन, मटन सेंटरकडून एक लाख ३८ हजार ५०० रुपये, कचऱ्या बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांकडून एक लाख ६९ हजार रुपये, वर्कशॉप, गॅरेज व्यावसायिकांकडून सहा लाख ९१ हजार असा एकूण दोन कोटी ६६ लाख २४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्लास्टिक जप्तीपोटी शासन नियमानुसार आकारलेल्या दंडाची रक्कम ४४ लाख एक हजार ५०० रुपये इतकी आहे.

  नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
  नागपूर शहर संपूर्ण देशात सुंदर शहर म्हणून ख्यातीप्राप्त होत आहे. आपले शहर हिरवे, सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यात नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याकडून कुठलाही उपद्रव होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घ्यावी आणि असे काही आढळल्यास त्वरित महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथक किंवा स्वच्छता विभागाकडे माहिती द्यावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार व आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145