Published On : Tue, Jul 10th, 2018

संतांचा अपमान सहन केला जाणार नाही – प्रकाश गजभिये

नागपूर : संभाजी भिडे यांनी संतांबाबत केलेल्या विवादित विधानाचा अनोखे आंदोलन करत विरोध दर्शवला. त्यांनी संत तुकारामाची वेशभूषा धारण करत विधानसभेच्या पायऱ्यांवर कीर्तन करून संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध केला. राज्यात अश्याप्रकारे संतांचा अपमान सहन केला जाणार नाही. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ आहे असा समज केवळ संभाजी भिडे यांनाच आहे. त्यांचे हे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे आहे.

त्यामुळे समाजात फूट निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंना राज्य सरकारने तात्काळ अटक करावी अशी मागणी गजभिये यांनी केली,

दरम्यान, संभाजी भिडे यांनी केलेल्या विवादित विधानाचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ज्ञानोबा-तुकोबांपेक्षा मनु श्रेष्ठ होता.

या संभाजी भिडे यांच्या विधानाशी सरकार सहमत नसेल तर तरुणांचे विचार भ्रष्ट करण्याचे काम करणाऱ्या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करून त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी आणि सहमत असेल तर सभागृहात ठराव मांडून मनुस्मृतीला भारतीय संविधानापेक्षा श्रेष्ठ जाहीर करावे, अशी उपरोधिक टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.