Published On : Mon, Sep 16th, 2019

शालेय अभ्यासक्रमात संविधानाचे महत्व शिकविले जावे : ई.झेड.खोब्रागडे

मैत्री बुद्ध विहार बेझनबाग येथे संविधान उद्देशिका शिलालेख कार्याचे भूमिपूजन

नागपूर : भारतीय संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. संविधानाने सर्व जाती, धर्म, पंथांना एकत्र गुंफले आहे. संविधानामुळेच देश चालतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुल्यांची जोपासना संविधानानेच केली आहे. संविधानामुळे मिळालेल्या अधिकाराची जाणीव प्रत्येक नागरिकाला व्हावी, याकरिता शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा संविधानाचे महत्व या विषयाचा समावेश करावा, असे प्रतिपादन राज्याचे माजी समजकल्याण आयुक्त तथा संविधान फाउंडेशनचे अध्यक्ष ई.झेड. खोब्रागडे यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने बेझनबाग बी लेआउट येथील मैत्री बुद्ध विहाराच्या परिसरात अशोक स्तंभ व राजमुद्रा असलेले १६ फुट उंच संविधान उद्देशिका शिलालेख कार्याचे माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांच्या हस्ते रविवारी (ता.१५) भूमिपूजन झाले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर नागपूरचे आमदार डॉ.मिलींद माने होते. याप्रसंगी नगरसेवक नरेंद्र वालदे, नगरसेवक किशोर जिचकार, भदंत नागाप्रकाश, मनपाचे माजी जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, अशोक पानतावणे, रेखा खोब्रागडे, गोपालराव बडोले, सुधीर जांभुळकर, लीला साळवे, सचिन टेंभुर्णे, जितू बन्सोड, सुनील रामटेके, अलका लाडे, किरण भिमटे, दिप्ती नाईक, शिशुपाल कोल्हटकर, कमलेश रोडगे, अशोक गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना ई.झेड.खोब्रागडे म्हणाले, संविधानामध्ये सामाजिक, आर्थिक, मौलिक विचार अंतभूर्त करण्यात आले आहेत. देशात विविधता असतानाही प्रत्येकाला स्वाभिमानाचे हक्क संविधानानेच प्रदान केले आहेत ही गौरवशाली बाब असून संविधानाबाबत जनजागृती होणे ही गरज आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी आमदार डॉ.मिलींद माने म्हणाले, ई.झेड. खोब्रागडे यांनी देशात प्रथमच संविधानाचे महत्व पटवून देण्यासाठी संविधान जागृती चळवळ सुरू केली. त्याचेच फलीत म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात संविधान दिवस म्हणून साजरा होत आहे. संविधाबाबत प्रत्येक नागरिक जागरुक व्हावे यासाठी सुरू असलेले प्रयत्न व त्यामध्ये मनपाचा सहभाग हे अभिनंदनीय आहे, असेही ते म्हणाले.

प्रत्येक बुद्ध विहार, धार्मीक स्थळांच्या परिसरात संविधान उद्देशिका शिलालेखाची निर्मिती झाल्यास संविधानाचे महत्व घरघरात पोहोचेल, असे मत मनपाचे माजी जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी संविधान जागृती चळवळ राबविल्याबद्दल माजी सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे यांचा आमदार डॉ.मिलींद माने व भदंत नागाप्रकाश यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व संविधान उद्देशिकेची प्रतिकृती प्रदान करुन सत्कार करण्यात आला. याशिवाय मैत्री बुद्ध विहार येथे पुढाकार घेउन शिलालेख निर्मितीकरिता पाठपुरावा केल्याबद्दल माजी जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनाही सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन सिद्धार्थ कडबे यांनी केले तर आभार अर्चना सुखदेवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ममता गेडाम, ज्योती गायकवाड, रजनी कडबे, पणोती पाटील, संगीता पाटील, सुशील लोखंडे, पायल शेंडे, भारती डोंगरे, छाया बेहरे, सुनंदा कोचे, आदींनी सहकार्य केले.