Published On : Fri, Jun 8th, 2018

शहरांच्या विकासात सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचे मोठे महत्त्व – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

मुंबई :- शहरांच्या विकासात सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे मुंबई शहरातील प्रवाशांसाठी मोबाईलद्वारे इंटिग्रेटेड टिकिटींग प्रणाली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. मुंबई मेट्रो वनच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त वर्सोवा मेट्रो स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई मेट्रो वनची कार्यप्रणाली भविष्यातील अन्य प्रकल्पांनाही मार्गदर्शक ठरेल, असे गौरवोद्गारही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी काढले.

कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते क्यू-आर कोड आधारित ‘मेट्रो मोबाईल टिकेटींग-स्किप-क्यू’ या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. तसेच माझी मेट्रो फेस्टिव्हलमध्ये पारितोषिक प्राप्त चित्रकृती, कविता आणि छायाचित्रांनी सजविलेल्या ‘माझी मेट्रो आर्ट ट्रेन’ चे उद्घाटन करण्यात आले.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमास आमदार प्रसाद लाड, अमित साटम, भारती लव्हेकर, एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर्सचे समूह व्यवस्थापकीय संचालक सतीश शेठ, मुंबई मेट्रो वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभयकुमार मिश्रा आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबई मेट्रो वनने मुंबईतील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. सक्षम सार्वजनिक परिवहन व्यवस्थेशिवाय शहरांचा विकास होऊ शकत नाही. आतापर्यंत मुंबईत उपनगरीय रेल्वेने प्रवाशांची सेवा केली. पण आता मेट्रोच्या रुपाने मुंबईला आधुनिक पर्याय उपलब्ध झाला आहे. मेट्रोला जगभर जलद, पर्यावरणीय दृष्ट्या स्वच्छ आणि सक्षम म्हणून मान्यता आहे. त्यामुळेच मुंबई मेट्रो वन यापुढील अन्य प्रकल्पांसाठीही त्यांच्या कार्यप्रणालीमुळे मार्गदर्शकच ठरेल.

मुंबईतील प्रवाशांच्या सुविधेसाठी मोबाईलद्वारे इंटिग्रेटेड टिकिटींग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. या सुविधेमुळे नागरिकांना कोणत्याही सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुविधेचा एकाच तिकिटाद्वारे वापर करता येणार आहे. लवकरच सुरु होणाऱ्या जलमार्गे प्रवासी वाहतूक सुविधेचाही त्यामध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी एमएमआरडीएचे आयुक्त श्री. राजीव यांच्या हस्ते मेट्रो वनच्या चार वर्षांतील वाटचालीवर आधारित कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.

मुंबई मेट्रो वन ही सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या सहभागिता (पीपीपी) या तत्त्वावर मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कडून चालविली जाते. ही कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण- एमएमआरडी, आणि फ्रान्सच्या व्हिओलिया ट्रान्सपोर्ट यांनी संयुक्तपणे स्थापन केली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement