Published On : Fri, May 29th, 2020

’तो’ खड्डा पूर्वीपासूनच कचरा घोटाळ्याच्या आरोपावर घनकचरा व्यवस्थापन उपायुक्तांकडून चौकशी

नागपूर : घराघरातून संकलीत केलेल्या कच-यामध्ये माती मिश्रीत करून जास्तीचे वजन वाढवून मनपाकडून पैसे उकळण्यात येत आहे व त्यासाठी बीव्‍हीजी या कंपनीद्वारे पार्कींग स्थळाजवळ खड्डा करण्यात आला असल्याच्या आरोपावर रविवारी (ता.२४) घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार यांनी घटनास्थळी पाहणी केली. पाहणीनंतर या संदर्भातील सत्यता पडताळण्याकरिता सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये बीव्‍हीजी कंपनीचे काम सुरू होण्यापूर्वीचे त्या परिसराचे फुटेज शोधण्यात आले. यामध्ये बीव्‍हीजी कंपनीच्या पार्कींग स्थळालगत असलेला खड्डा कंपनीला जागा उपलब्ध करून देण्याच्या आधीपासूनच असल्याचे निदर्शनास आले आहे.

कचरा संकलन करणा-या बीव्‍हीजी कंपनीला मनपातर्फे भांडेवाडी येथे पार्कींगसाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेजवळ खड्डा खणून त्यातील माती कच-यात मिश्रीत करून वजन वाढवून महानगरपालिकेकडून पैसे उकळले जात असल्याची तक्रार मनपाकडे प्राप्त झाली. बीव्‍हीजी कंपनीद्वारे शहरातील गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर आणि मंगळवारी झोनमधून कचरा संकलीत करण्यात येतो. लॉकडाउनमुळे कचरा कमी निघत असल्याने कंपनीद्वारे माती मिश्रीत करून कच-याचे वजन वाढविण्यात येत असल्याचाही आरोप तक्रारीद्वारे करण्यात आला. यासंबंधी घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार दखल घेत प्रत्यक्ष घटनास्थळी जाउन चौकशी केली.

Advertisement

चौकशीमध्ये निदर्शनास आले की, नोव्हेंबर २०१९मध्ये बीव्‍हीजी कंपनीला भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे पार्कींगसाठी जागा देण्यात आली. यापूर्वी २८ ऑगस्ट २०१९मध्ये संपूर्ण परिसराचे ड्रोनद्वारे सर्व्हे करण्यात आले. सर्व्‍हेमध्ये घेण्यात आलेल्या फुटेजमध्ये तक्रारदाराने नमूद केलेल्या खड्ड्याबाबतचे सुद्धा फोटो तपासण्यात आले असता त्यामध्ये तो खड्डा बीव्‍हीजी कंपनीचे काम सुरू होण्यापूर्वीचाच असल्याचे स्पष्ट दिसून आले.

त्यामुळे तक्रारकर्त्यांनी केलेल्या तक्रारीमध्ये सत्यता असल्याचे दिसून येत नाही. तरीही भविष्यात अशा तक्रारी प्राप्त होउ नये याची खबरदारी घेण्याकरिता व तक्रारकर्त्यांनी केलेल्या तक्रारीचे पूर्णत: समाधान करण्याकरिता मनपाद्वारे कच-याच्या वजन काट्यावर येणा-या वाहनांची तपासणी करण्यासाठी उपद्रव शोध पथकाचे दोन कर्मचारी तैनात करण्यात आले. हे कर्मचारी आलेल्या गाडीचे वजन तपासतील त्यामध्ये काही शंका आल्यास गाडीतील कचरा तपासून बघतील व त्यानंतर ती गाडी एका विशिष्ठ ठिकाणी रिकामी करण्यास सूचना देतील. यामध्ये जर माती आढळून आल्यास संबंधित गाडीचे वजन रद्द केले जाईल व कंत्राटदारावर करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती डॉ.प्रदीप दासरवार यांनी दिली.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement