Published On : Thu, Jul 27th, 2017

राज्यातील शेतकऱ्यांना शासन सौर ऊर्जेवर आणणार : ऊर्जामंत्री बावनकुळे

Advertisement


मुंबई:
राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा उपलब्ध करुन देण्यात येत असून सौर ऊर्जेवर चालणारे पंपही शेतकऱ्यांना देण्यात येतील. शेतकऱ्यांनी त्यासाठी आपला 5 टक्के वाटा भरावा. या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना या योजने मार्फत सौर ऊर्जेवर आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

आ. बाळाराम पाटील यांनी राज्यात ग्रीन एनर्जी निर्माण करण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला ऊर्जामंत्री उत्तर देत होते. या संदर्भात सविस्तर उत्तर देताना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, या योजनेसाठी आधी 5 एकर जमिनीची अट टाकण्यात आली होती. पण तेव्हा या योजनेस प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आता 10 एकर जमिनीची अट टाकण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपला 5 टक्के हिस्सा द्यायचा आहे. तेवढी रक्कमही शेतकरी भरायला तयार नाहीत. आदिवासी शेतकऱ्यांच्या 5 टक्के हिस्सा आदिवासी विभागाने व मागासवर्गीय शेतकऱ्याचा हिस्सा समाजकल्याण विभागाकडून घेता येईल. कोकणात या योजनेला प्रतिसाद मिळाला नाही. असे असले तरीही 6500 पंप शिल्लक असून कोकणातील 200-300 शेतकऱ्यांनी अर्ज केल्यास त्यांचा विचार करता येईल, असेही ऊर्जामंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत 800-900 शेतकऱ्यांना एक गट तयार करुन त्यांच्या शेतात वीज निर्मिती करुन दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळणार आहे. अहमदनगरमध्ये राळेगणसिध्दी व यवतमाळ जिल्हयात कोळंबी येथे प्रायोगिक स्तरावर हा प्रकल्प राबविला जात आहे. या कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून कामाचे कार्यदेशही देण्यात आले आहेत. लाभार्थीचा हिस्सा संबंधीत विभागाने भरण्याचा मुद्दा चांगला असल्याचे सभागृहातील अनेक आमदारांनी म्हटले. त्यावर ऊर्जामंत्री म्हणाले-कोकणातील अत्यल्प भूधारक शेतकरी असेल तर त्या शेतकऱ्यासाठी 5 टक्के हिस्सा भरण्याची अट शिथिल करता येईल.

तीन हॉर्स पॉवरच्या पंपासाठी शेतकऱ्यांना 16 हजार, पाच हॉर्स पॉवरच्या पंपासाठी 27 हजार व साडेसात हॉर्स पॉवरच्या पंपासाठी शेतकऱ्याला 36 हजार रुपये आपला 5 टक्के हिस्सा भरावा लागणार आहे. या प्रश्नाच्या चर्चेत आ. भाई जगताप, आ. प्रवीण दरेकर, आ. ॲङ राहूल नार्वेकर, आ. जयंत पाटील यांनी उपप्रश्न विचारले.

सकारात्मक भूमिका ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या उत्तराने समाधान झाल्यामुळे आ. प्रा. कवाडे यांनी बावनकुळेचे कौतुक करीत सकारात्मक भूमिका असलेले ऊर्जावान ऊर्जामंत्री असा उल्लेख सभागृहात केला. बावनकुळे आमच्या विदर्भाचे आहेत पण महाराष्ट्रातील प्रश्नांचाही सकारात्मक विचार करण्यात असे ही आ. कवाडे यावेळी म्हणाले.