ज्या शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त होत आहेत त्याला सरकार जबाबदार : अजित पवार


नागपूर: हे सरकार खुप घोषणा करते पण काम काही करत नाही. त्यामुळे सरकार तोंडावर पडते. कर्जमाफीही दिशाभूल करणारी निघाली. त्यामुळे सरकारने वेळीच शेतकऱ्यांना न्याय दयावा. किटकनाशकामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले. ही सरकारची जबाबदारी होती. सरकारने यावर योग्य ती उपाययोजना करायला हवी होती पण तसे झाले नाही. त्यामुळे जे संसार उध्दवस्त झाले त्याला हे सरकार जबाबदार आहे असा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शेतकरी प्रश्नावर बोलताना केला. विधानसभेमध्ये नियम २९३ अन्वये आपले विचार मांडले.

सरकारची कर्जमाफी देण्याची मानसिकता नव्हती. योग्य वेळ आली की,कर्जमाफी देवू असे म्हणत होते. शेतकरी संपल्यावर कर्जमाफी देणार की काय असं वाटत होते. संघर्षयात्रा निघाली आणि ठिणगी पेटली तिथून आंदोलनाला सुरुवात झाली मग पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी संप पुकारला. त्यावेळी सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आणि इच्छा नसताना कर्जमाफीची घोषणा सरकारला करावी लागली. मात्र ही कर्जमाफी फसवी निघाली असेही अजित पवार म्हणाले.

केंद्रसरकारची दानत नाही कर्जमाफी देण्याची. परंतु सरकारने ३ हजार कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले. जाहिरातींवर साफ खोटं लिहिण्यात आले. आजही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. सर्व गोष्टी जाहिरातींवर चालत नाही. सरकार चालवायला धमक लागते, योग्य निर्णय घेण्याची क्षमता लागते असा टोलाही अजित पवार यांनी सरकारला लगावला.

सत्ताधारी लोकच म्हणतात की, बोंडअळीमुळे लोक त्रस्त आहेत. दादा याविरोधात आवाज उठवा. नाना पटोले यांनी या सरकारला कंटाळून राजीनामा दिला आहे. सत्ताधारी पक्षातील आमदार आशिष देशमुखही आता नाराजी व्यक्त करत आहेत. सरकार जर असेच वागत राहिले तर जनसंघाचे,आरएसएसचे कट्टर समर्थकच यांच्यासोबत राहतील बाकी सगळे यांना सोडतील अशी टिकाही अजित पवार यांनी केली.


सरकारने अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील वीज काढली. ऊर्जा खात्याची आर्थिक परिस्थिती दयनीय आहे. जर सरकारने योग्य तो निर्णय घेतले नाही तर ऊर्जा खाते मोठया अडचणीत येईल. हे सरकार शेतकऱ्यांच्या मूळावरच उठले आहे. आज राज्यामध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात सर्वात जास्त आत्महत्या विदर्भामध्ये झाल्या आहेत. जर असेच चित्र राहिले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये विदर्भ देशात एक नंबरला येईल अशी भीतीही अजित पवार यांनी व्यक्त केली.

पीक विमा म्हणजे पैसे जमा करण्याचे साधन झाले आहे. शेतकऱ्यांना याचा काहीही फायदा होत नाही. कर्जमाफी करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही. पिकांना भाव दिला तरच शेतकरी टिकेल. सरकारने या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भात येवून वचन दिले होते की,शेतमालाला भाव देवू पण तसे झाले नाही. बोंडअळीसाठी धनंजय मुंडे यांनी आधीच सरकारला सावध केले होते. पण सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांना २५ हजार रुपये प्रति हेक्टरी मदत मिळायलाच हवी अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.