मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत.
राज ठाकरेंनी नुकतीच छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघे राज्यात जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला होता. यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रातील आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी मी आज मांडलेली भूमिका सामंजस्याची आहे की तेढ वाढवणारी आहे का? असा प्रश्न उपस्थित करत शरद पवार यांनी आपली बाजू मांडली. तसेच राज ठाकरे माझे विनाकारण नाव घेत असल्याचे ते म्हणाले.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन समाजामध्ये कटुता निर्माण होणार नाही, यादृष्टीने पावले टाकली पाहिजे. आज वेळीच काळजी घेतली नाही तर काय चित्र राहील, हे सांगता येणार नाही.
मी पर्याय सुचवला की, माझी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा झाली. आता तुमच्यामार्फत असे सुचवू इच्छितो, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्यांनी योग्य वाटतील त्या लोकांना बोलवावे.आम्ही विरोधी पक्ष म्हणून बैठकीला हजर राहू, आमची भूमिका सहकार्याची राहणार असल्याचे शरद पवार म्हणाले.