नागपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१७ सप्टेंबर २०२५) ७५ वर्षांचे झाले. या खास दिवशी भाजपकडून देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा दिवस वेगळ्या आठवणींनी साजरा केला. त्यांनी मोदींसोबत झालेल्या आपल्या पहिल्या भेटीची कहाणी लोकांसमोर मांडली.
फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत सांगितले,
“त्या काळात मी नागपूरचा महापौर आणि भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो. रेशीमबाग मैदानावर आरएसएसच्या एका शिबिराची जबाबदारी माझ्यावर होती. याच शिबिरात नरेंद्र मोदी आले होते. कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम डॉ. हेडगेवार स्मारकाला अभिवादन केले.”
ते पुढे म्हणाले, “मोदींना कुठे थांबायचं आहे, असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा सर्वांना वाटलं की ते आरामदायक गेस्टहाऊस निवडतील. पण त्यांनी अगदी साध्या निवासाचीच निवड केली. त्या क्षणी मला जाणवलं की हा नेता पद, वैभव किंवा विलासिता यांना महत्त्व न देता साधेपणा आणि सेवेला प्राधान्य देतो.”
फडणवीसांनी स्पष्ट केलं की, ही पहिली भेट त्यांच्या जीवनावर अमीट छाप सोडून गेली. “त्या एका प्रसंगाने मला समजलं की नरेंद्र मोदी का वेगळे आहेत आणि का लाखो लोक त्यांना आपला नेता मानतात, असेही ते म्हणाले.
मोदींच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त फडणवीसांची ही आठवण केवळ त्यांच्या वैयक्तिक अनुभवापुरती मर्यादित नसून मोदींच्या नेतृत्वातील सादगी व सेवाभावाचे दर्शन घडवणारी ठरली आहे.