Published On : Thu, Apr 30th, 2020

नागपुरातील पहिले ‘कम्युनिटी मार्केट’ सुरू

Advertisement

महापौर संदीप जोशी यांनी साधला शेतकरी व ग्राहकांशी संवाद

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहर लॉकडाउन करण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाठी सर्वत्र सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र भाजी बाजारात या निर्देशाचे ग्राहक आणि दुकानदारांकडून सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.

शिवाय वाढीव दरामध्येही भाजी विक्री होत असल्याच्याही नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून माफक दरात ताजा आणि उत्तम दर्जाचा
भाजीपाला, फळे नागरिकांना त्यांच्या घराजवळ उपलब्ध व्हावा या उद्देशाने महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून आठ रस्ता चौकातील लक्ष्मीनगर मैदानात शहरातील पहिले ‘कम्युनिटी मार्केट’ साकारण्यात आले असून त्याचा गुरूवारी (ता.३०) शुभारंभ झाला. यावेळी महापौर संदीप जोशी यांनी ‘कम्युनिटी मार्केट’ला भेट देउन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली व शेतकरी आणि ग्राहकांशीही संवाद साधला.

दीनदयाल थाली आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने ही संकल्पना राबविण्यात येत आहे. गुरूवारी (ता.३०) सकाळी ६ वाजता ‘कम्युनिटी मार्केट’ला सुरूवात झाली. विशेष म्हणजे या बाजारात सोशल आणि फिजिकल डिस्टंसिंगची पुरेपुर काळजी घेण्यात येत आहे. भाजी, फळांचे स्टॉल्स योग्य अंतरावर लावण्यात आले असून त्यापुढे पाच फुटाच्या अंतरावर चौकोन आखण्यात आले आहेत. या चौकोनामध्ये खुर्च्याही ठेवण्यात आल्या आहेत. शिस्तीमध्ये सुरक्षितरित्या भाजी खरेदी करता यावी यासाठी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता त्यांच्यासाठी रांगेत खुर्च्याही लावण्यात आल्या आहेत. बाजार संपल्यानंतर संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरणही करण्यात येत आहे.

दररोज सकाळी ६ ते ८.३० आणि सायंकाळी ६ ते ८.३० यावेळेत नागरिकांच्या सुविधेसाठी बाजार लावण्यात येत आहे. या ‘कम्युनिटी मार्केट’मुळे लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत माफक दरात पोहोविले जात आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही त्याचा थेट फायदा मिळत आहे. भाजी विक्री करताना किंवा खरेदी करताना कोणत्याही प्रकारे सोशल डिस्टसिंगची पायमल्ली होउ नये किंवा संसर्गाचा धोका निर्माण होउ नये यासाठी दीनदयाल थाली आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊनचे स्वयंसेवक कार्यरत आहेत. नागरिकांना आवश्यक मदत त्यांच्यामार्फत केली जाते. बाजारात भाजी खरेदी करायला येताना प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक आहे.

…तर शहरात इतर ठिकाणीही सुरू होणार ‘कम्युनिटी मार्केट’
लक्ष्मीनगर मैदानातील ‘कम्युनिटी मार्केट’ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मास्क लावून, सोशल डिस्टसिंगचे पालन करून सर्वच भाजी विक्रेते शेतकरी आणि ग्राहकांनीही मनपाला उत्तम सहकार्य केले आहे. लॉकडाउनमध्ये नागरिकांना माफक दरात चांगल्या व ताज्या भाज्या, फळे मिळावेत या उद्देशाने शहरात प्रायोगिक तत्वावर हे पहिले ‘कम्युनिटी मार्केट’ सुरू करण्यात आले आहे. येत्या दिवसांत या ‘कम्युनिटी मार्केट’चा प्रतिसाद कायम राहिल्यास शहरातील अन्य ठिकाणीही याच संकल्पनेनुसार संपूर्ण सुरक्षितरित्या असे मार्केट सुरू करण्यात येतील, अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.