Published On : Mon, Feb 8th, 2021

कार्यकर्त्यांचा विश्वास हीच काँग्रेस पक्षाची ताकद– सुनील केदार

– कोराडी महादुला येथील कार्यकर्ता मेळाव्यात उद्गार

स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेस पक्ष कार्यरत आहे. याच पक्षाच्या महान नेत्यांनी स्वातंत्र्याची चळवळ चालवून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. राष्ट्रभक्ती व देशप्रेम हेच काँग्रेस पक्षाचे ब्रीद वाक्य ठेवून काँग्रेस पक्षाची धुरा सामान्य कार्यकर्ते आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळत आहे. हाच सामान्य कार्यकर्ता पक्षाची खरी ताकद आहे असे उद्गार राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी कामठी विधानसभेतील कोरडी- महादुला येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले.
कोराडी येथील भारत सेलिब्रेशन येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता.

या कार्यक्रमात प्रमुख रूपाने नागपूर जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रश्मी बर्वे, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सुरेश भोयर, माजी नगराध्यक्ष कामठी नगरपरिषद शकुर नागानी उपस्थित होते.

आपल्या वक्तव्यात माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांनी कामठी विधानसभेतील काँग्रेस कार्यकर्त्यांमधे मंत्री सुनील केदार यांच्यामुळे नवीन ऊर्जा संचारल्याचे वक्तव्य केले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी शासनाच्या गोर गरीब जनतेकरिता असलेल्या योजना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पोहोचविण्याचे आव्हाहन कार्यकर्त्यांना केले.

आपल्या वक्तव्यात मंत्री सुनील केदार यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष हा नेहमीच शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे राहिला आहे. जेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी आपल्या देशातील परिस्थिती अत्यंत भयंकर होती पण अशाही परिस्थितीत तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या देशाला नुसतेच सांभाळलेच नाही तर या देशाला अन्नधान्याच्या बाबतीत सुजलाम सुफलाम बनविले परंतु आजचा सत्ताधारी पक्ष मात्र शेतकऱ्यांना तिळमात्र मोजत नाही आहे.

मागील सत्तर दिवसापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल केंद्रातील सत्ताधारी एक शब्दही बोलत नाही आहे. ज्या शेतकऱ्यांनि कोरोना सारख्या महाभयंकर काळात सुद्धा देशाची अर्थव्यवस्था सांभाळली आज तोच शेतकरी मात्र आपल्या हक्काकरिता दिल्लीच्या दरबारात आंदोलन करीत आहे परंतु अजूनही सत्ताधाऱ्यांना जाग नाही आहे. मात्र काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मंत्री सुनील केदार यांनी कार्यकर्त्यांना जमेल त्या पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय देण्याकरीता प्रयत्न करावा असे आव्हाहन केले.

कामठी विधानसभा ही माझी दत्तक विधानसभा आहे आणि या विधानसभेच्या विकासाकरिता मी नेहमीच कटिबद्ध राहील असे सूतोवाच मंत्री सुनील केदार यांनी केले. कोराडी महादुला येथील समस्यांचे निराकरण करण्याकरिता नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात येईल असे सुद्धा मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

सदर काँग्रेस कार्यकर्ता मेळावा महादुला नगरपंचायत चे माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांनी आयोजित केला. यावेळी जिल्हापरिषद सदस्य अवंतिका लेकुरवाळे, माजी जिल्हापरिषद सदस्य प्रेमलाल पटेल, सुधाकर तकीत, पंचायत समिती सदस्य दिशाताई चनकापुरे,काँग्रेस सेवादलचे किशोर धांडे, गुलाब खैरे, शंकर सोनेकर, अनुराग भोयर उपस्थित होते.