Published On : Mon, Sep 4th, 2017

सैन्य भरतीसाठी येणाऱ्या युवकांसाठी आवश्यक सुविधा – सचिन कुर्वे

· 18 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी आवश्यक
· 4 ते 17 ऑक्टोबरपर्यंत विदर्भातील युवकांसाठी सेना भरती
· पोलीस मुख्यालय मैदानावर होणार सेना भरती

नागपूर: विदर्भातील युवकांना भारतीय सेनेत भरती होण्यासाठी सैन्य भरतीचा कार्यक्रम येथील पोलीस मुख्यालय मैदानवर 4 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. सैन्य भरतीसाठी विदर्भातून येणाऱ्या युवकांना आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी विविध विभाग प्रमुखांनी सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पारपाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.

भारतीय सेना दलात सैन्य भरतीसाठी नागपूर येथे 4 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत सैन्य दलातर्फे युवकांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. या भरती मोहिमेसाठी विदर्भातून हजारो युवक उपस्थित राहणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजि‍त करण्यात आली होती.

यावेळी नागपूर येथील भारतीय सैन्य दलाचे संचालक कर्नल सुधीर सिंह, मेजर जहिर अली खान, पी.एल. पाल, निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दिपक लिमसे तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी विदर्भातील युवकांना दिनांक 18 सप्टेंबरपर्यंत www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीनुसार दिनांक 4 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर पर्यंत तालुका व जिल्हानिहाय सैन्य भरतीचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. सैन्य भरतीसाठी संपूर्ण विदर्भातून येणाऱ्या युवकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. विविध विभागांकडे जबाबदारी देण्यात आल्या आहे.

सैन्य भरतीसाठी उपस्थित राहणाऱ्या युवकांच्या वैद्यकीय सुविधेसाठी जिल्हा शल्यचित्किसक यांनी रुगण वाहिकेसह आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्यावी, तसेच पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस लाईन टाकळी येथील भरतीच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना घेण्यात याव्यात. सैन्य भरतीबाबत जिल्हयातील सर्व महाविद्यालयांमध्ये पूर्व सुचना देवून उत्सूक असलेल्या युवकांना माहिती देण्यासाठी शिक्षणाधिकारी यांचेवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सैन्य भरतीसाठी येणाऱ्या खेळाडू प्रवर्गातील उमेदवारांची प्रमाणपत्र तपासणी करणे, महानगर पालिकेतर्फे सैन्य भरती स्थळावर आवश्यक सुविधा तसेच स्वच्छता करणे, परिवहन महामंडळातर्फे विशेष बसेसची व्यवस्था करणे, तसेच सैन्य भरतीसाठी उमेदवारांच्या भोजनासह निवास व्यवस्थेसंदर्भात स्वयंसेवी संस्थांकडून व्यवस्था करण्या संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.

प्रारंभी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दिपक लिमसे यांनी सैन्य भरतीचा कार्यक्रम व तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध व्हावी यासंदर्भात माहिती दिली. भरती निर्देशक कर्नन सुधीर सिंह यांनी भरती प्रक्रिया सुरळीत पारपाडण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केला. नागपूर येथील सैन्य भरती मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात विदर्भातील युवक सहभागी होत असल्यामुळे वाहतुकीस खोळंबा होणार नाही या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव यांनी विभागनिहाय करण्यात येणाऱ्या कामासंदर्भात आढावा घेवून आवश्यक सूचना दिल्या.