Published On : Fri, Jan 19th, 2018

निर्यात उद्योग वाढीस लागणे आवश्यक – सुभाष देसाई

मुंबई : जागतिक बाजारपेठेत निर्यात उद्योगात देशाचा वाटा हा दोन टक्क्याहूनही कमी आहे, याचे गांभीर्य आणि महत्त्व लक्षात घेऊन निर्यात उद्योग वाढीस लागणे आवश्यक असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे सांगितले. आयएएमसी चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने एक्स्पोर्ट प्रमोशन ॲण्ड इंटरनॅशनल ट्रेड या विषयावर हॉटेल ताज येथे एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आयएएमसी चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. ललित कनोडिया, निर्यात क्षेत्रातील उद्योजक रवी पोद्दार, राजेश मेहता, राज नायर उपस्थित होते. निर्यात उद्योगातील संधी आणि आव्हाने यावर या परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे.

श्री. देसाई पुढे म्हणाले, जगातील अनेक देश आज भारतातील बाजारपेठेकडे आकृष्ट होत आहेत. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात आयात होत असते. मात्र त्याच वेळी जागतिक बाजारपेठेत देशातून होणारी निर्यात हे केवळ १.७ टक्के म्हणजे दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे, यावर गांभीर्याने कृती करण्याची वेळ आली आहे. आज इथे ही परिषद आयोजित करुन आपण याची सुरुवात केली आहे. या परिषदेमध्ये व्यक्त होणाऱ्या सकारात्मक बदलांसाठी केलेल्या सूचनांचे राज्य शासन स्वागत करेल.

वस्त्रोद्योग आणि पादत्राणे या दोन्ही उद्योगांमधील निर्यातीच्या अनेक संधी आहेत. जगाला लागणाऱ्या कापडाची निर्मिती करण्यासाठी जागा लागते. यापूर्वी अनेक मोठ्या ब्रॅण्डच्या कपड्यांचे उत्पादन चीन, बांगलादेश, व्हिएतनाम या सारख्या देशात होत होते. मात्र आता चीनमधील कामगार खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे. एका कामगारामागे सुमारे 75 हजार रुपये एवढा खर्च होतो तर भारतात हेच प्रमाण केवळ 15 हजार रुपये एवढा खर्च येतो. कमी उत्पादन खर्च ही भारताची जमेची बाजू आहे. त्यामुळे अनेक देश भारताकडे उत्पादक देश म्हणून पाहत आहेत.

वस्त्रोद्योगाप्रमाणेच पादत्राणांच्या उत्पादनातही अनेक संधी आहेत. कोल्हापूर चप्पल या उत्पादनाला जागतिक ओळख आहे. याला उत्तम मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंगची आवश्यकता आहे. निर्यात क्षेत्रातील संधी ओळखून यात अधिक काम करण्याची गरज आहे.

शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्याची भूमिका आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहेत. अमरावती येथे उत्कृष्ट दर्जाचे पार्क तयार झाले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील कापूस उत्पादक परिसरात यासारखेच नऊ पार्कस् उभारण्यात येणार आहेत. याशिवाय निर्यात उद्योगांना सहाय्यभूत ठरणारे एसईझेड मध्ये लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहेत. तर निर्यातीसाठीच ग्लोबल कंटेनर टर्मिनल तयार होत आहे.

फेब्रुवारी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या परिषदेत जास्तीत जास्त उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे निमंत्रणही यावेळी उद्योगमंत्र्यांनी दिले.