
बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीत येथे लँडिंगदरम्यान अपघात झाला.या अपघातात विमान पूर्णतः जळून खाक झाल्याचे सांगितले जात आहे.
माहितीनुसार, या विमानातून अजित पवार यांच्यासह मुंबई पीएसओ हेड कॉन्स्टेबल विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, पिंकी माळी आणि एक फ्लाइट अटेंडंट प्रवास करत होते. या सर्वांचा मृत्यू झाला.
आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी सभांचे आयोजन करण्यात आले होते. सुपे जिल्हा परिषद गटासाठीही एक सभा नियोजित होती. या कार्यक्रमांसाठी अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामतीकडे येत होते. मात्र लँडिंगच्या वेळी विमानाला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
हे विमान सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी मुंबईहून उड्डाण करून ८.५० वाजता बारामतीत पोहोचले. लँडिंगदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने विमान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळल्याचे सांगितले जात आहे. काही वृत्तांमध्ये खराब हवामानाचाही उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्तानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबीय बारामतीत दाखल झाल्याची माहिती आहे. वृत्तानुसार, उद्या २९ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. रुग्णालयाबाहेर अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचेही सांगितले जात आहे.








