
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक विधान केल्याप्रकरणी गायिका अंजली भारती हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या नगरसेविका तथा बेटी बचाव बेटी पढाव सहप्रमुख सौ. लक्ष्मी यादव यांनी धंतोली पोलीस ठाण्यात यासंदर्भात निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान गायिका अंजली भारती हिने अमृता फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरील शब्दप्रयोग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वक्तव्यात हिंसक आणि समाजात तेढ निर्माण करणारे शब्द वापरण्यात आल्याचा दावा नगरसेविका लक्ष्मी यादव यांनी केला आहे.
एका महिला लोकप्रतिनिधी म्हणून अशा प्रकारची वक्तव्ये निषेधार्ह असून, यामुळे महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचतो तसेच समाजात चुकीचा संदेश जातो, असेही निवेदनात म्हटले आहे. संबंधित वक्तव्याचा व्हिडिओ पुरावा म्हणून ग्राह्य धरून गायिका अंजली भारती हिच्यावर तात्काळ FIR दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी धंतोली पोलीस स्टेशनकडून निवेदनाची दखल घेण्यात आली असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.








