शिक्षण विभागाने आतापर्यंत केवळ विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले; विरोधकांचे आरोप खोटेनाटे – शिक्षणमंत्री विनोद तावडे

Advertisement

Vinod Tawde
नागपूर: सरकारने राज्यामध्ये शिक्षणाचे वाटोळे केले असल्याचा विरोधकांचा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ठामपणे खोडून काढला. गेल्या 15 वर्षाच्या काळात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारने जी शिक्षणाची वाईट अवस्था करुन ठेवली होती, ती भाजप शिवसेनेचे सरकार दुरुस्त करत असल्याचे सांगतानाच आपण शिक्षण विभागात केवळ विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या हिताचे निर्णय घेतले.

निवडणुकींच्या मतांसाठी कधीही शिक्षणाचा विचार केला नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले.

1314 शाळा या बंद करण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळताना तावडे यांनी सांगितले की या शाळा 3 ते 4 विद्यार्थी आणि 1-2 शिक्षकांच्या होत्या त्यामुळे या शाळा जवळच स्थलांतरीत केल्या. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन, क्रिडा स्पर्धा, सहल आदी उपक्रम होत नव्हते. त्यामुळे या कमी पटसंख्या असलेल्या विद्यार्थ्यांना समाजीकीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी होता येत नव्हते. परंतु आमदार कपिल पाटील खोटे नाटे आरोप करीत असून, शिक्षण विभागाने 12 हजार शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. ते केवळ खोटा अपप्रचार करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

ज्या 1314 शाळा स्थलांतरीत करण्यात आल्या आहेत, त्या शाळांमधील एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही. तसेच या शाळांमधील शिक्षकांनाही स्थलांतरीत शाळेत समाविष्ट करण्यात येणार आहे, असेही तावडे यांनी सांगितले.

गेल्या 3 वर्षामध्ये भाजपा –शिवसेना सरकारने शिक्षण विभागात फक्त विद्यार्थ्यांचे हित ध्यानात ठेवून निर्णय घेतले. परंतु काहीजणांच्या पोटात मात्र दु:खत आहे, ते केवळ नक्राश्रू ढाळत आहेत, असेही तावडे यांनी सांगितले.