Published On : Fri, Sep 20th, 2019

महावितरणचे तरोडी (खुर्द) वितरण केंद्र सुरु

Advertisement

नागपूर: महावितरणच्या मौदा उपविभागात येणाऱ्या वीज ग्राहकांच्या सोयीसाठी तरोडी येथे नवीन तरोडी(खुर्द) वितरण केंद्र सुरु करण्यात आले. राज्याचे ऊर्जा,नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नवीन तरोडी(खुर्द) वितरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

तरोडी(खुर्द) येथील वीज ग्राहकांना विजेची काही समस्या असल्यास या अगोदर कापशी वीज वितरण केंद्रावर जावे लागत होते. पण नवीन वितरण केंद्र सुरु झाल्याने कमी वेळेत वीज ग्राहकांच्या तक्रारीचा निपटारा होईल, असा विश्वास नामदार बावनकुळे यांनी व्यक्त केला. आपण मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यावर येथील वीज विषयक समस्यांची आपल्याला जाणीव असल्याने या अगोदर येथे ३३/११ के. व्ही. वीज उपकेंद्र मंजूर करून ते कार्यान्वित केले. आता ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी उपकेंद्राच्या परिसरात वितरण केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी उपस्थितांना दिली.

या अगोदर कापशी वीज केंद्रात सुमारे ११ हजार घरगुती, ७२० लघुदाब(औदयोगिक), ७० उच्चदाब, ११०० शेती पंप वीज ग्राहक होते. पण तरोडी(खुर्द) येथे नवीन कार्यालय सुरु झाल्याने ८हजार घरगुती वीज ग्राहक, ११० लघुदाब(औदयोगिक), १० उच्चदाब, ८५० शेती पंप वीज ग्राहकांना लाभ होणार आहे. अशी माहिती महावितरण, नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. तरोडी(खुर्द) वितरण केंद्रात तरोडी बुद्रुक, अडका,टेमसना,परसोडी, खेडी, पांढुर्णा, पांढरकवडा या गावातील वीज ग्राहकांच्या तक्रारीचा निपटारा करण्यात येणार आहे.

कापशी वितरण केंद्राकडे कापशी बुद्रुक, कापशी खुर्द,आसोली,शिरपूर, धारगाव येथील वीज ग्राहकांच्या तक्रारीचा निपटारा करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा वीज नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख, कामठी तालुका वीज नियंत्रण समितीचे अध्यक्ष मोबीन पटेल, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशाताई सावरकर, बिडगावचे सरपंच निकेश कातुरे, विनोद पाटील, अनिता चिकटे, विजय दूरबुडे, रामकृष्ण वंजारी, रमेश चिकटे, महावितरण नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे यावेळी उपस्थित होते.